Afratafri Marathi Movie : ‘अफरातफरी’च्या ‘होऊन जाऊ दे’ गाण्यात ग्लॅमर आणि मस्तीचा तडका

मुंबई : आगामी मराठी चित्रपट ‘अफरातफरी’ सध्या चर्चेत असून, या चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ ( Houn Jau De ) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्लॅमरस अंदाज, रंगीबेरंगी रोषणाई, कलाकारांची धमाल आणि ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. ‘केरळा स्टोरी’ फेम अभिनेत्री प्रणाली घोगरे हिचा आकर्षक अंदाजही या गाण्याचं खास आकर्षण ठरत आहे.
या गाण्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गाणं ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करण्यात आलं आहे. मराठी चित्रपटात संपूर्ण गाण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयोग प्रथमच करण्यात आल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. याआधी १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या जो जीता वही सिकंदर चित्रपटातील ‘पहला नशा, पहला खुमार’ या गाण्यात आमिर खानवर ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने लिपसिंक करण्याचा प्रयोग करण्यात आला होता.‘होऊन जाऊ दे’च्या शूटिंगदरम्यान पत्त्यांचा खेळ, झगमगणारं सेटअप आणि कलाकारांचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे ‘अफरातफरी’च्या मस्तीखोर वातावरणाची झलक या गाण्यातून मिळते. गाण्याला मुग्धा कऱ्हाडे यांचा दमदार आवाज लाभला असून वरुण लिखाते यांनी संगीत दिलं आहे. गीतलेखन मंदार चोळकर यांचं असून नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांनी केलं आहे.
संगीत दिग्दर्शक वरुण लिखाते यांनी सांगितलं की, ‘होऊन जाऊ दे’ हे गाणं तयार करताना मस्ती, उत्साह आणि ग्लॅमर यांचा योग्य मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळी ऊर्जा मिळाली असून, चित्रपटाच्या वातावरणाला साजेसं हे गाणं तयार झाल्याचं त्यांनी म्हटलं.
दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांच्या मते, ४८ फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने संपूर्ण गाणं लिपसिंक करणं हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होतं. कलाकारांच्या हालचाली, गाण्याचे ठेके आणि लिपसिंक यांचा अचूक मेळ साधण्यासाठी शूटिंगदरम्यान विशेष काळजी घ्यावी लागली. कलाकारांनीही हा प्रयोग उत्साहाने केल्याचं त्यांनी सांगितलं.मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित ‘अफरातफरी’ची निर्मिती स्कायलाईन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केली असून, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्स यांचा सहयोग आहे. चित्रपटात मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, असावरी जोशी, हेमंत पाटील आणि किरण माने यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 9 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



