मनोरंजन

Adkitta Marathi Movie Review : ‘अडकित्ता’मध्ये मातृत्वाचा पेच; आई मोठी की संगोपन करणारी?

मुंबई / पंकज राणे : कुटुंब, नाती आणि भावनिक गुंतागुंत याभोवती फिरणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आता मातृत्व, अपराधीपणा आणि पालकत्वाच्या संघर्षाची वेगळी कथा पाहायला मिळत आहे. ‘अडकित्ता’ हा मराठी चित्रपट नुकताच ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न आहे—मुलाला जन्म देणारी आई मोठी की त्याचं संगोपन करणारी? ‘अडकित्ता’ची कथा गौतम, कस्तुरी आणि मंगल या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरते. करिअरला महत्त्व देणाऱ्या गौतम आणि कस्तुरीच्या आयुष्यात कस्तुरीच्या मातृत्वानंतर मोठा बदल होतो. गर्भावस्थेदरम्यान जुळ्या मुलांपैकी एका बाळाचा मृत्यू होतो, तर कस्तुरी आणि दुसऱ्या बाळाच्या जीवावरही संकट येतं. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर कस्तुरी आणि बाळाचा जीव वाचतो. या मुलाचं नाव ओंकार असतं.

ओंकारच्या जन्मानंतर करिअर आणि पालकत्वाचा समतोल साधताना गौतम-कस्तुरीला मदतीची गरज भासते आणि त्यांच्या आयुष्यात मंगल येते. ओंकारची काळजी घेताना मंगल आणि त्याच्यात भावनिक नातं निर्माण होतं. मात्र, हे नातं कस्तुरीच्या मनात असुरक्षितता आणि अपराधीपणाची भावना निर्माण करतं.

मंगलच्या भूतकाळातही मोठं दुःख दडलं आहे. स्वतःचं मूल गमावल्यानंतर ओंकारशी तिची जवळीक अधिक भावनिक बनते. त्यामुळे एका बाजूला आपल्या मुलापासून दूर राहण्याची भीती असलेली कस्तुरी, तर दुसऱ्या बाजूला मातृत्वाची ओढ असलेली मंगल, असा भावनिक संघर्ष चित्रपटात पाहायला मिळतो.चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष निखिल परंधकर यांनी केलं असून, हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या भूमिका चित्रपटात आहेत. विशेषतः मंगलच्या भूमिकेत सई ताम्हणकरने संवेदनशील आणि भावनिक व्यक्तिरेखा साकारली आहे.‘अडकित्ता’ सध्या ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सिनेमा : अडकित्ता
ओटीटी : मराठी झी५
निर्मिती : मंगेश पवार, संपदा वाघ, मयूर हरदास
दिग्दर्शक : आशुतोष परांडकर
लेखन : भक्तिप्रसाद देशमाने, आशुतोष परांडकर
कलाकार : सई ताम्हणकर , सखी गोखले , सिद्धार्थ चांदेकर
छायांकन : सौमित्र यज्ञोपवित
संकलन : जयंत जठार
दर्जा: चार स्टार

Related Articles

Back to top button