बॉलिवूडमध्ये नवा अंदाज घेऊन आदिनाथ कोठारे सज्ज; ‘नई नवेली’मध्ये यामी गौतमसोबत मुख्य भूमिकेत

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा आदिनाथ आता ‘नई नवेली’ या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेत्री यामी गौतमसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरच्या पहिल्याच झलकपासून आदिनाथचा रुबाबदार आणि हटके अंदाज लक्ष वेधून घेतो. आदिनाथ आणि यामी गौतमची फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
आदिनाथने यापूर्वी विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची क्षमता दाखवली आहे. आता ‘नई नवेली’मध्ये तो एका वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. अवस्थी कुटुंबाभोवती फिरणारी ही हॉरर-कॉमेडी कथा असून, कौटुंबिक नातेसंबंध आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘रामायण’नंतर आदिनाथचा हा आणखी एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये वेगवेगळ्या भूमिका आणि विषयांमधून त्याच्या अभिनयातील विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. वैविध्यपूर्ण कथा आणि व्यक्तिरेखा निवडण्याकडे आदिनाथचा असलेला कल ‘नई नवेली’मधूनही दिसून येतो.
चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली होत असून बालाजी मोहन यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. हॉरर, कॉमेडी आणि फॅमिली ड्रामाचा मिलाफ असलेला हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, ‘नई नवेली’सोबतच आदिनाथ ‘रामायण’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हिंदी मनोरंजनविश्वातील त्याचा पुढचा प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा ठरणार आहे.



