मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी MMRDA चा मास्टर प्लॅन; पॉड टॅक्सी आणि हवेत धावणारी बस प्रवाशांना अवघ्या मिनिटांत पोहोचवणार घरापर्यंत!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने मुंबईत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत अगदी जलद गतीने पोहोचता यावे, यासाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’चे अद्ययावत जाळे उभारले जात आहे. मेट्रोच्या विस्तारासोबतच आता प्रवाशांना चालकरहित पॉड टॅक्सी आणि रस्त्यावरून हवेत धावणाऱ्या स्वयंचलित (ऑटोमेटेड) बसचा आधुनिक पर्याय मिळणार आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे देशातील सर्वात मोठे ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होत आहे. वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान देशातील पहिली पॉड टॅक्सी धावणार असून, विरार बुलेट ट्रेन स्थानकावरून चालकरहित एलिव्हेटेड बस सेवा सुरू केली जाईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) यासाठी तब्बल ₹१.५ लाख कोटींचा ‘मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन’ आखला आहे.
विरारमध्ये धावणार देशातील पहिली ऑटोमेटेड एलिव्हेटेड बस
विरार बुलेट ट्रेन स्थानकावरून जलद वाहतूक सुलभ करण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका ‘ऑटोमेटेड गाईडवे ट्रान्झिट’ (AGT) प्रणालीवर काम करत आहे. हा ३ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर विरार (पूर्व) मधील बुलेट ट्रेन स्थानकाजवळील सहकार नगर ते थेट नालासोपारा मेट्रो स्थानकापर्यंत जोडला जाईल. विरार स्थानकाभोवतीच्या ४६३ हेक्टर क्षेत्राच्या ट्रान्झिट नियोजनात जपानची ‘JICA’ आणि ‘TUSPL’ ही संस्था तांत्रिक सहकार्य करत आहे.
BKC मध्ये देशातील पहिली पॉड टॅक्सी सेवा
बीकेसीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि बुलेट ट्रेन टर्मिनसवरून सुलभ प्रवासासाठी देशातील पहिली चालकरहित पॉड टॅक्सी धावणार आहे. ९ किलोमीटर लांबीच्या या एलिव्हेटेड मार्गावर ३८ स्थानके असतील, जी वांद्रे आणि कुर्ला उपनगरीय रेल्वे स्थानकांना थेट बीकेसी व्यावसायिक केंद्राशी जोडतील.
वैशिष्ट्ये: ही एआय-संचलित, पूर्णपणे वातानुकूलित आणि बॅटरीवर चालणारी पॉड टॅक्सी असून, एका पॉडमध्ये ६ प्रवाशांची आसनक्षमता असेल. ही टॅक्सी ताशी ४० किमी वेगाने धावेल.
ऑन-डिमांड सेवा: अवघ्या १५ ते ३० सेकंदांत प्रवाशांना पॉड टॅक्सी उपलब्ध होईल, जी मधे कुठेही न थांबता प्रवाशांना थेट ठरलेल्या ठिकाणी पोहोचवेल.
विस्तार: ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईतही हे नेटवर्क वाढवले जाणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा मेट्रो स्थानक ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान लवकरच याची चाचणी घेतली जाईल.
मेट्रोचा महाविस्तार आणि अंडरग्राउंड सबवे
मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किलोमीटरचे मेट्रो जाळे प्रस्तावित असून त्यापैकी १०० किलोमीटरहून अधिक मार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने सेवेत येतील. ३६ किमी लांबीची मुंबईची पहिली भुयारी मेट्रो ‘ॲक्वा लाईन ३’ (कफ परेड ते आरे-JVLR) जमिनीखाली २५ ते ३० मीटर खोलीवर धावणार आहे. बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट भुयारी सबवेद्वारे या मेट्रो मार्गाशी जोडले जाईल. याशिवाय मोनोरेल प्रणालीमध्येही स्वदेशी ‘CBTC’ सिग्नलिंग तंत्रज्ञान आणि १० नवीन ट्रेन दाखल होणार आहेत.
‘वन मुंबई, वन तिकीट’: एकाच कार्डवर प्रवास
एमएमआरडीए लवकरच एक ‘कॉमन मोबिलिटी ॲप’ आणि ‘सिंगल स्मार्ट कार्ड’ जारी करणार आहे. या एकाच कार्ड किंवा ॲपच्या माध्यमातून मुंबईकरांना लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस आणि पॉड टॅक्सीमध्ये स्वतंत्र तिकीट न काढता अखंड प्रवास करता येईल. या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, नवी मुंबई किंवा मीरा-भाईंदर येथून नरिमन पॉईंट, कुलाबा किंवा बीकेसीपर्यंतचा प्रवास अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत करणे शक्य होणार आहे.



