मुंबई

Global Investment: महाराष्ट्रात चेक कंपन्यांचा जम बसणार? फडणवीसांची मोठी ऑफर

मुंबई : भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक कंपन्यांनी अधिकाधिक चेक तंत्रज्ञानाची उत्पादन निर्मिती महाराष्ट्रात करावी. चेक कंपन्या आणि संस्थांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास राज्य शासन त्यांना अत्यंत वेगाने सहकार्य करेल. महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक उद्योग व गुंतवणूक भागीदारीचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सर्व सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कॅरोल हॅवलॉक व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातील संधी आणि गुंतवणूक याबाबत चर्चा केली. यावेळी चेक प्रजासत्ताकच्या उद्योग व व्यापार मंत्रालय संचालक (युरोपेतर देश) रिचर्ड ह्लाव्हाती, उप-परराष्ट्र मंत्री मेरी शतारदोव्हा, परराष्ट्र मंत्रालय, महासंचालक शमारेक लिब्रिचिकी, महावाणिज्य दूत (मुंबई), कातेरिना वोव्हकोव्हा, चेक दूतावास प्रभारी राजदूत कातेरिना पीटरसेन, नवी दिल्ली, चेक खाण तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रतिनिधी डॅनियल वासेक, ‘एनेलेक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगन, सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ही भारतातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून परकीय गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र आहे. सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. केवळ अर्थव्यवस्थेचा आकार वाढविण्याऐवजी प्रगत उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनण्याची महाराष्ट्राची महत्वाकांक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत १९२० मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकियाने वाणिज्य दूतावास सुरू केला. त्यामुळे शतकाहून अधिक काळ मुंबई हे भारत-चेक प्रजासत्ताक संबंधांचे एक प्रमुख प्रवेशद्वार राहिले आहे. या ऐतिहासिक संबंधांना आता वैयक्तिक गुंतवणुकीपलीकडे नेत अधिक संरचित भागीदारीत रूपांतरित करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

प्रगत उत्पादन आणि वाहन क्षेत्रातील सहकार्याला मोठा वाव आहे. स्कोडा कंपनी भारतात २५ वर्षांपासून कार्यरत असून पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे तिचे उत्पादन प्रकल्प आहेत. या भागीदारीचा पुढील टप्पा म्हणून इलेक्ट्रिक वाहने, अचूक अभियांत्रिकी, यंत्रसामग्री, स्वयंचलन आणि वाहन उद्योगाशी संबंधित टियर-वन व टियर-टू चेक पुरवठादारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अचूक अभियांत्रिकी, हवाई क्षेत्र, संरक्षण, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकी आणि प्रगत तंत्रज्ञानातील चेक प्रजासत्ताकच्या क्षमतांना पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूरमधील औद्योगिक समूहांसह राज्यातील वैज्ञानिक संस्थांची जोड देता येईल. चेक प्रजासत्ताक आणि महाराष्ट्रातील कंपन्या व संस्थांनी केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन व विकास तसेच सहउत्पादनावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

चेक टेक्निकल युनिव्हर्सिटी, चार्ल्स युनिव्हर्सिटी आणि ब्रनो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या अग्रगण्य विद्यापीठांनी महाराष्ट्रात शैक्षणिक संधी निर्माण करण्याच्या शक्यता तपासाव्यात. संयुक्त पदवी अभ्यासक्रम, संशोधन कार्यक्रम, पीएच.डी. आणि विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम राबविण्यासाठीही सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्राकडे अभियंते, तंत्रज्ञ, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक आणि कुशल युवकांचे मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे. चेक उद्योगांच्या गरजांनुसार उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञ, अभियंते, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक, परिचारिका आणि अन्य कुशल मनुष्यबळासाठी संरचित महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक कौशल्य गतिशीलता भागीदारीच्या शक्यता तपासाव्यात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारत आणि युरोपीय महासंघाचे आर्थिक संबंध नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. या संधीचा उपयोग नव्या पुरवठा साखळ्या, तंत्रज्ञान आणि संस्था उभारण्यासाठी करावा. चेक प्रजासत्ताकने महाराष्ट्राकडे भारताचे प्रवेशद्वार तसेच जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादनाचे व्यासपीठ म्हणून पाहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोळसा गुणवत्ता व्यवस्थापनासाठी चेक तंत्रज्ञानाच्या सहकार्याचा प्रस्ताव
महाराष्ट्रातील ऊर्जा व खाण क्षेत्रातील संधींवर चर्चा
उपपंतप्रधान कॅरोल हॅवलॉक यांनी महाराष्ट्रात स्वागत केल्याबद्दल आभार मानले. महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास आणि परस्पर सहकार्य पुढे नेण्यास चेक प्रजासत्ताक उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात केवळ तंत्रज्ञानाची विक्री न करता दीर्घकालीन भागीदारी, तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण आणि शक्य झाल्यास उपकरणांचे स्थानिक उत्पादन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

चेक प्रजासत्ताक येथील उद्योग क्षेत्रातील कंपनी प्रतिनिधीनी त्यांच्या उत्पादन, तंत्रज्ञान आणि उपलब्ध कौशल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील ऊर्जा आणि खाण क्षेत्रातील सहकार्याच्या संधींबाबत झालेल्या चर्चेत हॅवलॉक यांनी कोळशाची गुणवत्ता मोजणारे ऑनलाइन विश्लेषक, स्वयंचलित नमुना संकलन यंत्रणा, कोळसा मिश्रण व गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि कोळसा साठ्यांमधील स्वयंप्रज्वलन रोखणाऱ्या औष्णिक दृश्य प्रणालींची माहिती दिली.

चेक मायनिंग टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या ९० सदस्य कंपन्या भूमिगत व खुल्या खाणी, वीज प्रकल्प, सुरक्षा उपकरणे, गाळणी व वायुवीजन यंत्रणा तसेच वायूप्रदूषण कमी करणारे तंत्रज्ञान पुरवतात. खनिज उत्खननापासून त्याची वाहतूक आणि अंतिम प्रक्रियेपर्यंत आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची या कंपन्यांची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एनालेक्स कंपनीने विविध देशांत ४०० हून अधिक यंत्रणा कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button