मुंबई

ST Bus Update: एसटी स्थानकांवरील तृतीयपंथीयांची कुचंबणा थांबणार!

मुंबई : एसटीने प्रवास करताना स्वच्छतागृहाची गरज भासली, तरी स्वतंत्र सुविधा नसल्याने तृतीयपंथीयांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. इतर प्रवाशांप्रमाणे मूलभूत सुविधा मिळाव्यात, ही त्यांची अपेक्षा आता पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी ९ कोटी ७६ लाख ६३ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

परिवहन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सदर प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता.

सहा प्रदेशांतील ३१ विभागांत सुविधा

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा प्रदेशांतील ३१ विभागांमधील एसटी बसस्थानकांवर ही स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. प्रत्येक स्वच्छतागृह सुमारे सहा चौरस मीटरचे असेल. पाणी, सांडपाणी व्यवस्था आणि वीजजोडणीसह एका स्वच्छतागृहासाठी सुमारे २ लाख ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोल्हापूरला सर्वाधिक निधी

या कामांसाठी कोल्हापूर विभागाला ५५.२० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावतीला ५०.७५ लाख, तर अहिल्यानगर आणि नांदेडला प्रत्येकी ५०.४० लाख रुपये मिळणार आहेत. नागपूरसाठी ४८.४० लाख आणि रायगडसाठी ४८ लाख रुपयांची तरतूद आहे. धाराशिव, बीड, परभणी, भंडारा आणि यवतमाळ या विभागांचाही योजनेत समावेश आहे.

कल्याण मंडळाच्या निधीतून उभारणी

या स्वच्छतागृहांचा संपूर्ण खर्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या तृतीयपंथीय कल्याण मंडळासाठी मंजूर निधीतून केला जाणार आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी आराखड्यांना वास्तुविशारदांची मंजुरी, सविस्तर अंदाजपत्रक आणि कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक असेल.

स्वच्छतागृह ही केवळ एक सुविधा नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाशी जोडलेली गरज आहे. प्रवासादरम्यान मूलभूत सुविधांसाठीही अडचणी सहन कराव्या लागू नयेत, अशी तृतीयपंथीयांची अपेक्षा आहे. एसटी स्थानकांवरील या नव्या सुविधेमुळे त्यांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल. आता मंजूर कामे प्रत्यक्षात कधी पूर्ण होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button