
पंकज राणे
मुंबई : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि भारताचा आघाडीचा अल्ट्रा-एंड्युरन्स अॅथलीट हार्दिक दयानंद पाटील यांनी 2026 ची विनफास्ट आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप यशस्वीपणे पूर्ण केली आहे. जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी 16 तास 5 मिनिटे आणि 44 सेकंदांत शर्यत पूर्ण करत भारताचा तिरंगा जागतिक क्रीडा व्यासपीठावर अभिमानाने फडकवला. हवाई येथील अत्यंत आव्हानात्मक वातावरणात पार पडणाऱ्या या स्पर्धेत सलग 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर मॅरेथॉन धावणे अशी तीन कठीण आव्हाने पूर्ण करावी लागतात. प्रतिकूल हवामान, वादळी वारे आणि रणरणत्या उन्हाचा सामना करत हार्दिक यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
11 वर्षांची जिद्द आणि मेहनत; अखेर स्वप्न साकार
हार्दिक पाटील यांच्यासाठी हा विजय केवळ एका स्पर्धेतील यश नसून, 11 वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता आहे. 2015 मध्ये अॅरिझोना येथे पहिली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांनी हवाईतील कोना येथे होणाऱ्या आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले होते. तब्बल 46 आयर्नमॅन शर्यतींचा अनुभव, सातत्यपूर्ण सराव आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अखेर हे स्वप्न साकार केले.आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना हार्दिक पाटील म्हणाले, “2015 मध्ये मी कोना येथील आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे स्वप्न पाहिले होते. 11 वर्षांचा विश्वास, जिद्द आणि कठोर सराव या एका क्षणात सामावला होता. माझा संदेश हाच आहे की, कधीही हार मानू नका. जेव्हा तुमची जिद्द तुमच्या कारणांपेक्षा मोठी असते, तेव्हा कोणतेही स्वप्न अशक्य नसते.”
युवा पिढीला फिटनेसचा संदेश
युवा पिढीला संदेश देताना हार्दिक पाटील म्हणाले की, फिट राहण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत छोटे बदल करणं महत्त्वाचं आहे. रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंगसारख्या व्यायामांसाठी वेळ काढा. त्यासोबत योगा किंवा जिमलाही प्राधान्य द्या. वेळेवर झोपणं, नियमित जेवण करणं आणि सकस आहार घेणं याकडे विशेष लक्ष द्या. फिटनेस ही केवळ काही दिवसांची गोष्ट नसून, ती जीवनशैलीचा भाग बनवायला हवी, असा संदेश हार्दिक यांनी युवा पिढीला दिला.
भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी कामगिरी
हार्दिक दयानंद पाटील हे भारतातील आघाडीचे अल्ट्रा-एंड्युरन्स ट्रायथलीट आणि मॅरेथॉनपटू आहेत. भारतीय नागरिक म्हणून सर्वाधिक फुल आयर्नमॅन शर्यती पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एंड्युरन्स स्पोर्ट्समध्ये सातत्याने आव्हानांचा सामना करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.हार्दिक यांच्या या कामगिरीमुळे भारतासह दक्षिण आशियातील तरुण खेळाडूंना जागतिक स्तरावर एंड्युरन्स स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. 11 वर्षांच्या जिद्दीला मिळालेलं हे यश मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नंही पूर्ण करता येतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित करतं.



