मुंबई

थकित वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी ३५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना पकडले

नायगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; यापूर्वी फोन-पेद्वारे १० हजार रुपये स्वीकारल्याची तक्रार

मुंबई : थकित वेतनाचे बिल तयार करून ते मंजुरीसाठी पाठविणे आणि मंजूर करून घेण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या एल विभागातील वरिष्ठ लिपिक बद्रीनाथ शिवहरी थोरवे (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १३ ऑक्टोबर रोजी कारवाईदरम्यान ताब्यात घेतले. तक्रारदाराकडून मागणी केलेल्या लाचेपैकी दुसरा हप्ता म्हणून पाच हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अहवालात देण्यात आली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हे २९४ दिवस वैद्यकीय रजेवर होते. या कालावधीत त्यांचे वेतन बंद करण्यात आले होते. रजेवरून पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांची २४८ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली, तर उर्वरित रजा विनावेतन करण्यात आली. मंजूर रजेच्या कालावधीतील थकीत वेतनाचे बिल तयार करून ते ट्रेझरीकडे पाठविणे आणि मंजूर करून घेण्यासाठी वरिष्ठ लिपिकाने ३५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी १० हजार रुपये फोन-पेद्वारे यापूर्वी स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.

उर्वरित रकमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. १६ सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान, यापूर्वी स्वीकारलेल्या १० हजार रुपयांव्यतिरिक्त आणखी २५ हजार रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या अहवालात म्हटले आहे.

त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान मागणी केलेल्या लाचेपैकी दुसरा हप्ता म्हणून पाच हजार रुपये स्वीकारताना थोरवे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून, लाचेची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.

या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अहवालात नमूद आहे. आरोपीच्या घरझडतीची कारवाईही सुरू होती. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त मच्छींद्र दिवे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक जगदीश मोरे आणि त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Back to top button