मुंबई

मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिरे आयोजित करा…

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीतील नाव किंवा नोंदींबाबत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत दावे-हरकती दाखल करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, तसेच नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

बृहन्मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

प्रारूप मतदार यादीतील नाव, नोंदी किंवा अन्य तपशिलांबाबत काही आक्षेप अथवा दुरुस्तीची आवश्यकता असल्यास नागरिकांना विहित प्रक्रियेनुसार दावे आणि हरकती दाखल करता याव्यात, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. मुदतवाढीच्या कालावधीत ही प्रक्रिया योग्य प्रकारे राबवण्याबरोबरच नागरिकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर आणि डॉ. अविनाश ढाकणे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार, महाराष्ट्राचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर तसेच करनिर्धारण व संकलन विभागाचे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button