मुंबई

Fadnavis vs Congress: ‘डबल ढोलकी’ म्हणत ’ फडणवीसांनी सिब्बलांचा जुना व्हिडिओ काढला!

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (SIR) काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू केले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या संसदेतील जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसकडून SIR प्रक्रिया रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच फडणवीस यांनी ‘एक्स’वर ‘काँग्रेसची डबल ढोलकी!’ असे शीर्षक देत व्हिडिओ पोस्ट केला. काँग्रेस सध्या SIR विरोधात भूमिका घेत असली, तरी पक्षाच्या सत्ताकाळात तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत वेगळी भूमिका मांडली होती, असा दावा त्यांनी केला.

सिब्बल यांच्या वक्तव्यात काय?

फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिब्बल मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कारणांबाबत माहिती देताना दिसतात. मतदार दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झाल्यास, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे नोंदीत बदल झाल्यास किंवा मतदाराचा मृत्यू झाल्यास नाव वगळले जाऊ शकते, असे ते सांगतात.

एखाद्या मतदाराचे नाव चुकीने वगळले गेले, तर संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन पुन्हा नोंदणीची मागणी करता येते, असेही सिब्बल यांच्या वक्तव्यात नमूद आहे. या वेळी ३६ लाख ४४ हजार १०५ मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मागणी केल्याचा आकडाही त्यांनी सांगितल्याचे व्हिडिओतून दिसते.

‘संसदेतील नोंदी बदलत नाहीत’

या व्हिडिओचा संदर्भ देत फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. “काँग्रेसच्या राजकारणाचे रंग बदलले, पण संसदेतील रेकॉर्ड बदलत नाहीत,” असे त्यांनी म्हटले. सिब्बल यांच्या तत्कालीन वक्तव्याचा संदर्भ लक्षात घेऊन नागरिकांनी काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यापूर्वी मंगळवारी केलेल्या पोस्टमध्ये फडणवीस यांनी SIR मुळे दुबार नोंदी आणि मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका मांडली होती. मतदार यादी अचूक आणि विश्वासार्ह असणे निष्पक्ष निवडणुकीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

काँग्रेसने SIR प्रक्रियेतील कारभारावर आक्षेप घेत ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडून SIR किती महत्वाचे सांगितलं जातं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर जुन्या संसदीय वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसला खिंडीत पकडल्याचे दिसते.

SIR वरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कपिल सिब्बल यांच्या जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करून फडणवीस यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आता या जुन्या वक्तव्यावर काँग्रेस काय उत्तर देते आणि SIR विरोधातील आंदोलनावर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button