गोवंडीत २.५३ कोटींच्या नशेच्या गोळ्या जप्त; एकाला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (ANC) गोवंडी परिसरात कारवाई करून सुमारे २.५३ कोटी रुपये किमतीच्या ९,८०० सायकोट्रॉपिक गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ANCच्या वरळी युनिटला गोवंडीतील डॉ. जाकीर हुसेन नगर परिसरात ‘बटन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या नशेच्या गोळ्यांची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका निवासी इमारतीत छापा टाकला.
या कारवाईत ४,५०० नायट्राझेपाम (NITCOR-10) गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्यांची अंदाजे किंमत १ कोटी ९८ लाख रुपये आहे. तसेच ५,३०० अल्प्राझोलम (PROCALM-1) गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ५५.१२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम ८(क) आणि २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीकडून या नशेच्या गोळ्यांचा पुरवठा कुठून होत होता, त्याचे खरेदीदार कोण आहेत आणि या मागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिस आयुक्त देवेन भारती, संयुक्त पोलिस आयुक्त अनिल कुंभार, अतिरिक्त पोलिस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रृंगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



