मारहाणप्रकरणी महापौर रितू तावडेंना एक हजारांचा दंड

दहा वर्षे जुने प्रकरण,शिक्षकाला केली होती मारहाण
मुंबई :दहा वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने बुधवारी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. रितू तावडे ह्या दहावर्षीपूर्वी महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष होत्या त्यावेळी त्यांनी एका शिक्षकाला मारहाण केली होती.त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्याप्रविष्ठ आहे.
या आरोपांशी निगडित सुनावणीला अनुपस्थित राहिल्यास वॉरंट काढण्यासह जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी तावडे यांना दंडाची रक्कम आठवडाभरात जमा करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल झाले असले तरी अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत. आरोपींची वारंवार गैरहजेरी ही खटला लांबवण्याच्या वृत्तीचे निदर्शक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
तावडे यांच्यावतीने त्यांचे वेळापत्रक व्यग्र असून, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमुळे न्यायालयात उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. अन्य दोन आरोपींनीही सामाजिक कार्यामुळे व्यग्र असल्याचे कारण देत वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्याची मागणी केली. मात्र, अतिरिक्त सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी या अर्जांना विरोध केला.



