सिरिंजसदृश वस्तूने शाळकरी विद्यार्थ्यावर हल्ला.

मुंबई : घाटकोपर प्रभाग क्रमांक १२८ येथील शाखेच्या मागील परिसरात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या यश चौरसिया या विद्यार्थ्यावर त्याच्याच वयोगटातील काही मुलांनी सिरिंजसदृश वस्तूने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर यश बेशुद्ध पडल्याची माहिती आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने यशला संत मुक्ताबाई महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून आवश्यक उपचार केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
नगरसेविका सई शिर्के यांची रुग्णालयात भेट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसे नगरसेविका तथा स्थापत्य समिती सदस्या सई शिर्के यांनी संत मुक्ताबाई रुग्णालयात जाऊन यश आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच डॉक्टरांकडून यशच्या प्रकृतीची माहिती घेतली.
या घटनेबाबत बोलताना सई शिर्के यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्यावर झालेली ही घटना गंभीर असून परिसरातील मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सई शिर्के यांनी मुंबई पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
तसेच पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे. परिसरात कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने पोलिसांना किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.



