महाराष्ट्र

Political Twist: महायुती-मविआत बंडखोरी; मतविभाजनाचा फायदा कोणाच्या पथ्यावर?

प्रशांत गोडसे

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांत ही निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. ९ ऑक्टोबर नंतरच अंतिम लढतिचे चित्र स्पष्ट होईल.

या निवडणुकीत महायुतीसमोर सर्वात मोठे आव्हान हे घटक पक्षांमधील उमेदवारांचे आहे. काही मतदारसंघांत भाजप आणि शिंदे शिवसेना उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे महायुतीचे मतविभाजन होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

पुणे पदवीधरमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव, शिंदे शिवसेनेचे सचिन सानप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवार मैदानात राहिल्यास येथे तिरंगी लढत होईल.

पुणे शिक्षकमध्येही महायुती आमनेसामने

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिंदे शिवसेनेचे मंगेश चिवटे आमनेसामने आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. ठाकरे गटाचे सुनील जगतापही मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये कराळे मास्तर डोकेदुखी होणार का

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने येथील समीकरणही बदलू शकते.तसेच संजय थुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे मास्तरांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांच्यासमोर आव्हान भजपा?

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा सामना ठाकरे शिवसेनेचे दिलीप घुगे यांच्याशी असणार आहे.मात्र, भाजपमधील नाराजीमुळे या मतदारसंघातही महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. भाजपाचे नेते एम के देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतापसिंह पाटील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अमरावतीत बहूकोणी लढत?

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या अदिती पोहरे, ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने आणि शिवसेना कडून किरण सरनाईक यांच्यात लढत असेल. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अर्ज भरले आहे. येथील लढत महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार का हे पहावे लागेल. युवा स्वाभिमानी संघटने कडून प्रीती रेवणे,शेखर भोईर आणि सुमित पवार हे भाजपा आमदारांचे निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात आहे. पोहरा देवीचे महंत सुनील महाराज आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात बहूकोणी लढत पाहायला मिळू शकते

९ ऑक्टोबरनंतर खरे चित्र स्पष्ट

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

विधान परिषद निवडणूक केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी न राहता, मित्रपक्षांमधील लढतीमुळेही रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button