महाराष्ट्र

Farmer Protest: शेती संकटावरून किसान सभा आक्रमक; कोल्हापूर अधिवेशनात आंदोलनाची दिशा ठरणार

कोल्हापूर : दुष्काळ, पीकविमा, कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव आणि वाढता उत्पादन खर्च या प्रश्नांवरून अखिल भारतीय किसान सभा आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. किसान सभेचे २४वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सोमवारी कोल्हापुरात सुरू झाले. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातून सुमारे ४०० शेतकरी नेते, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या अधिवेशनात शेती संकटाचा आढावा घेण्याबरोबरच आगामी शेतकरी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात झाली. त्यानंतर शहरातून शेतकरी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन, माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले आणि राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिवेशनाला उपस्थित आहेत.

दुष्काळापासून पीकविम्यापर्यंत चर्चा

राज्यातील शेतीसमोरील विविध प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. दुष्काळ, पीकविमा, कर्जमाफी, शेतीमालाला मिळणारा भाव, वाढता उत्पादन खर्च आणि शेतजमिनीच्या मालकीचे प्रश्न यावर प्रतिनिधी आपली मते मांडणार आहेत.

हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, केंद्र आणि राज्य सरकारची कृषीविषयक धोरणे तसेच शेतकरी चळवळीसमोरील आव्हाने यावरही चर्चा होणार आहे.

आंदोलनाची रणनीती ठरणार

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले संघटनेचा राजकीय, वैचारिक आणि संघटनात्मक अहवाल अधिवेशनात मांडणार आहेत. या अहवालावर राज्यभरातून आलेले प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. त्यानंतर आगामी काळात कोणत्या प्रश्नांवर आंदोलन करायचे आणि ते राज्यभर कसे उभे करायचे, याची रणनीती निश्चित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक संघर्ष उभारणे आणि संघटनेची ताकद वाढवणे, यावरही अधिवेशनात भर दिला जाणार आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनानंतर राज्यात शेतकरी आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button