लग्नाच्या अवघ्या आठ महिन्यांत रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडामध्ये होतात वाद! रश्मिकाने केला खुलासा…

मुंबई / हैदराबाद: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी आणि लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. लग्नानंतर आता ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर ‘रणबाली’ (Ranbaali) या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सगळ्यात एका पॉडकास्टमधील काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात या दोघांमधील गोड नाते आणि सुंदर बाँडिंग पाहायला मिळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान या नवविवाहित जोडप्याने आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि नात्याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी लग्नानंतर त्यांच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीवरून छोट्या-मोठ्या कुरबुरी होतात, याचा खुलासा रश्मिकाने केला; तर दुसरीकडे विजयने पत्नी रश्मिकाच्या समजूतदारपणाचे भरभरून कौतुक केले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पॉडकास्टमध्ये रश्मिकाला लग्नानंतरच्या पहिल्या वादाबद्दल विचारण्यात आले. त्यावर हसत उत्तर देत रश्मिका म्हणाली, “आमच्यात कधीही मोठी भांडणे होत नाहीत, कारण आम्ही एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय करतो.”
लहानसहान रुसव्या-फुगव्यांबद्दल सांगताना रश्मिकाने मजेशीर शैलीत सांगितले की, “कधी कधी मला विजयचे लक्ष हवे असते आणि तो फोनवर एखाद्या कामात व्यग्र असतो. अशा वेळी मी प्रेमाने एकदा-दोनदा ‘विजू-विजू’ अशी हाक मारते. मात्र, तिसऱ्यांदाही त्याचे लक्ष गेले नाही, तर मला थोडा राग येतो. अर्थात, माझा चेहरा आणि राग पाहताच तो लगेचच फोन बाजूला ठेवून प्रतिसाद देतो!”
विजयने रश्मिकाची प्रशंसा करताना सांगितले की, रश्मिका अत्यंत समजूतदार आहे. समोरची व्यक्ती जेव्हा एखाद्या गंभीर कामात किंवा विचारात व्यग्र असते, तेव्हा तिला आवश्यक असलेली स्पेस (Space) देणे किती गरजेचे असते, हे तिला उत्तम समजते. या मुद्द्यावर रश्मिकानेही सहमती दर्शवली. दोघेही एकाच सिनेसृष्टीत कार्यरत असल्याने शूटिंग, सिनेमांचे प्रमोशन आणि चित्रपट प्रदर्शित होताना येणारा मानसिक ताण (Stress) एकमेकांना न सांगताही चांगल्या प्रकारे समजतो, असे तिने नमूद केले.
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे शाही थाटात लग्नगाठ बांधली होती. या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडते.
लग्नानंतर ही जोडी प्रथमच ‘रणबाली’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार असून रश्मिका त्याची पत्नी ‘जयम्मा’च्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रश्मिका तिच्या आगामी ‘मायसा’ (Mysa) या चित्रपटामुळेही सध्या चर्चेत आहे.



