माधुरी दीक्षितसमोर हॉट सीटवर बसताच चाहत्याचा भन्नाट अंदाज; ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर रंगला मजेशीर किस्सा

मुंबई :‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोच्या नव्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असून, तिचा खास अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसोबत माधुरीचे मजेशीर संवाद आणि खास क्षण सध्या चर्चेत आहेत.अशाच एका भागात जळगावचे शरद राजपूत यांनी आपल्या उत्साहाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शरद हे माधुरी दीक्षितचे मोठे चाहते असून आपल्या आवडत्या अभिनेत्रीसमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे शरद यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर माधुरी दीक्षितचा फोटो होता. त्यामुळे माधुरी आणि तिच्या चाहत्याची ही भेट आणखी खास ठरली.
‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीत शरद यांनी बाजी मारत हॉट सीटवर स्थान मिळवलं. यानंतर त्यांनी आपला ब्लेझर काढून सेटवरच भन्नाट डान्स करत विजयाचा आनंद साजरा केला. शरद यांचा हा उत्स्फूर्त अंदाज पाहून सेटवरील वातावरणही आनंदी झालं.
दरम्यान, माधुरी आणि शरद यांच्यातील आणखी एक संवाद चांगलाच रंगला. माधुरीने शरद यांना त्यांच्या पत्नीबद्दल विचारलं. त्यावर शरद यांनी मिश्किलपणे, “ती माझं सगळं ऐकते,” असं उत्तर दिलं. शरद यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर माधुरीने आपल्या खास विनोदी अंदाजात विचारलं, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?”
माधुरीच्या या मिश्किल प्रश्नावर सेटवर एकच हशा पिकला. दोघांमधील हा सहज आणि विनोदी संवाद प्रेक्षकांसाठीही खास मनोरंजनाचा क्षण ठरणार आहे.दरम्यान, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात माधुरी दीक्षितची सूत्रसंचालक म्हणून झालेली एंट्री विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी आता स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना, त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेताना आणि त्यांच्यासोबत मजेशीर संवाद साधताना दिसणार आहे. त्यामुळे या पर्वात ज्ञानासोबतच मनोरंजन आणि भावनिक क्षणांचीही मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘कोण होणार करोडपती’चा हा नवा प्रवास येत्या १२ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर पाहता येणार आहे. तसेच सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.



