मनोरंजन

अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापुरात शूटिंगला सुरुवात; मंदार जाधवने सांगितले ‘धाकट्या सुनबाई’च्या सेटवरचे खास अनुभव!

मुंबई : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता मंदार जाधव सध्या झी मराठीवरील ‘धाकट्या सुनबाई’ या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तो वेदांत पटवर्धन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. वेदांतच्या भूमिकेसाठी केलेलं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, महेश कोठारे यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी आणि कोल्हापुरातील शूटिंगचे खास अनुभव याबद्दल मंदारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

वेदांत पटवर्धनची भूमिका माझ्यासाठी खास!

‘धाकट्या सुनबाई’मधील वेदांत पटवर्धन हा आजच्या पिढीचा सुशिक्षित आणि सुसंस्कृत तरुण आहे. आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा, प्रत्येकाला सांभाळून घेणारा आणि सर्वांचा आदर करणारा असा त्याचा स्वभाव आहे. मात्र, अन्याय किंवा अत्याचार त्याला अजिबात सहन होत नाही. योग्य गोष्टीसाठी अगदी कुटुंबाच्या विरोधातही उभं राहण्याची त्याची तयारी असते. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये आणि प्रत्येक मुलीला आपल्या जोडीदारामध्ये असावा, असा हा वेदांत आहे, असं मंदारने सांगितलं.

महेश कोठारेंसोबत पुन्हा काम करण्याची संधी!

‘धाकट्या सुनबाई’ ही मालिका कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. यापूर्वीही मंदारने कोठारे व्हिजनसोबत काम केलं आहे. त्यामुळे या मालिकेसाठी फोन आला तेव्हा त्याने लगेच होकार दिला. झी मराठीसोबत काम करण्याची संधी आणि महेश कोठारे यांच्यासोबत पुन्हा काम करता येणार असल्याचा आनंद द्विगुणित झाल्याचं त्याने सांगितलं.

वेदांतच्या भूमिकेसाठी केलं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन!

प्रत्येक नवीन भूमिकेतून प्रेक्षकांना आपली वेगळी बाजू पाहायला मिळावी, असा मंदारचा प्रयत्न असतो. वेदांतच्या व्यक्तिरेखेसाठी त्याने स्वतःच्या फिटनेसवर विशेष लक्ष दिलं आहे. रोज जिमला जाणं, खाण्यापिण्याचं पथ्य पाळणं आणि शारीरिक बदलांसाठी मेहनत घेणं, असा त्याचा दिनक्रम आहे. त्याच्या या नव्या लूकला आणि मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला.

अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापुरात शूटिंगला सुरुवात!

मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचं शूटिंग कोल्हापुरात करण्यात आलं आहे. याबद्दलचा खास अनुभव सांगताना मंदार म्हणाला की, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्याने अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि तिचे आशीर्वाद घेऊन चित्रीकरणाला सुरुवात केली. याशिवाय पंचगंगा नदीच्या गंगाघाटावरही अनेक दृश्यांचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे वेदांत आणि राधिकाची पहिली भेट याच नदीच्या काठावर होते.

शूटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिकांना मिळताच कलाकारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा अनुभव खूप खास असल्याचं मंदारने सांगितलं.

राधिका-वेदांतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस!

मालिकेच्या संपूर्ण टीमचं आणि सहकलाकारांचं मंदारने कौतुक केलं. सर्व कलाकारांमध्ये सुरुवातीपासूनच छान केमिस्ट्री जुळून आली असून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे उत्तम पद्धतीने कलाकारांकडून काम करून घेत असल्याचं त्याने सांगितलं. विशेषतः राधिका आणि वेदांतच्या जोडीला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद त्याच्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे.

मंदारच्या अभिनयप्रवासाची सुरुवात झी टीव्हीवरील ‘अल्लादिन’ या मालिकेतून झाली होती. या मालिकेत त्याने अल्लादिनची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा झी कुटुंबाशी जोडल्याचा आनंद व्यक्त करत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘धाकट्या सुनबाई’ या नव्या मालिकेलाही प्रेक्षकांनी असंच प्रेम आणि आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा मंदारने व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button