मनोरंजन

Aali Mothi Shahani Movie Review : चिमुकलीच्या इच्छेभोवती रंगलेली मजेशीर गोष्ट! कसा आहे हृता-सारंगचा ‘आली मोठी शहाणी’? वाचा रिव्ह्यू

प्रांजली कुलकर्णी

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित ‘आली मोठी शहाणी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लहान मुलांच्या मनात दडलेल्या निरागस इच्छा, त्यांचे हट्ट आणि मोठ्यांसारखं जगण्याची उत्सुकता याभोवती या चित्रपटाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. बाप्पाकडे मोठं होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका चिमुकलीची ही गोष्ट नेमकी कशी खुलत जाते? हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांचा अभिनय कसा आहे? जाणून घेऊया या चित्रपटाच्या रिव्ह्यूमधून…

कथानक
‘आली मोठी शहाणी’ ही गोष्ट गोव्यात राहणाऱ्या गुंड्या म्हणजेच गार्गी कामत या चिमुकलीची आहे. लहानपणाच्या बंधनांमधून बाहेर पडून मोठ्यांसारखं स्वच्छंद जगावं, स्वतःला हवं ते करावं, अशी तिची इच्छा असते. मोठं झाल्यावर काय काय करायचं, याचंही तिने मनाशी पक्कं ठरवलेलं असतं.

गणेशोत्सवाच्या दिवसांत गार्गी आपली मोठं होण्याची इच्छा थेट गणपती बाप्पाकडे व्यक्त करते आणि इथूनच कथेला एक वेगळं वळण मिळतं. तिची ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर आयुष्यात नेमकं काय घडतं? घरातील माणसं आणि समाज यांच्यासमोर तिला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात हळूहळू उलगडत जातात.

विशेष म्हणजे, अनेक अडचणींच्या प्रसंगांत गणपती बाप्पा तिच्या मदतीला धावून येतो. प्रत्येक वेळी तिचं संकट दूर करण्यासाठी बाप्पा कशी मदत करतो, हे पाहणं रंजक ठरतं.

चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं गोव्यातील लोकेशन. गोव्याचं निसर्गसौंदर्य, रंगीबेरंगी वातावरण, समुद्रकिनारे आणि नाइटलाइफ अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आले आहेत. त्यामुळे कथेसोबतच गोव्याची एक सुंदर सफरही अनुभवायला मिळते.

मजेशीर घटना, भावनिक प्रसंग, थरार आणि उत्कंठा यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटातील गाणी थिरकायला लावणारी आहेत. मात्र, काही प्रसंगांमध्ये चित्रपटाची गती मंदावते आणि कथानक थोडं ताणल्यासारखं वाटतं. मध्यंतरानंतर मात्र कथेत वेग येतो आणि पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाढत जाते. वेळेआधी मोठं होण्याच्या नादात काय घडू शकतं, याचा सुंदर उलगडा चित्रपटाच्या शेवटी होतो.

लेखन आणि दिग्दर्शन

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. एका लहान मुलीच्या निरागस इच्छेला केंद्रस्थानी ठेवून त्यातून विनोद, भावनिक प्रसंग आणि नाट्यमय वळणं निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. वेगळ्या विषयाची निवड हे चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

अभिनय

अभिनयाच्या बाबतीत हृता दुर्गुळेने आपल्या संयमी आणि भावपूर्ण अभिनयातून व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. तर सारंग साठ्येचा अथर्व शास्त्रीच्या भूमिकेतील सहज वावर आणि विनोदी शैली मनाला भावते.

बालकलाकार मैत्रेयी दाते हिने साकारलेली छोटी गार्गी विशेष लक्षवेधी आहे. एका हट्टी आणि निरागस चिमुकलीच्या भूमिकेतील तिचा सहज अभिनय चित्रपटात वेगळीच रंगत आणतो. याशिवाय ऋजुता देशमुख, गुरु ठाकूर, सुहिता थत्ते आणि संजय खापरे यांनीही आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि ऋषी सक्सेना यांच्या भूमिका तुलनेने छोट्या असल्या, तरी त्या प्रभावी ठरतात.

जमेच्या बाजू आणि उणिवा

चित्रपटाचं वेगळं कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, गोव्याचं निसर्गरम्य चित्रीकरण आणि विनोद-भावनांचा मेळ या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे, काही ठिकाणी जाणवणारी संथ गती आणि उगाचच ताणलेले प्रसंग या चित्रपटाच्या उणिवा म्हणता येतील.

एकूणच, ‘आली मोठी शहाणी’ हा आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकामुळे लक्ष वेधून घेतो. एका चिमुकलीची निरागस इच्छा, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या मजेशीर घटना आणि त्यातून उलगडणारा भावनिक प्रवास अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहू शकता.

मुंबई समाचार रेटिंग : ⭐⭐⭐☆☆ (३/५)

Related Articles

Back to top button