मनोरंजन

Janhavi Killekar :‘बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ’ वक्तव्यावर ट्रोलिंग; जान्हवी किल्लेकरचा संताप, म्हणाली…

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 5’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कोल्हापूरला गेल्यानंतर त्वचेच्या समस्येमुळे बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करत असल्याचे वक्तव्य तिने एका मुलाखतीत केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जान्हवीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. आता या ट्रोलिंगवर जान्हवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.जान्हवीने दोन भागांत व्हिडीओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. व्हायरल झालेल्या क्लिपचा संदर्भ देताना तिने सांगितले की, केवळ काही सेकंदांची रिल पाहून तिच्या वक्तव्याचा अर्थ काढण्यात आला. संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी पूर्ण पॉडकास्ट पाहण्याची गरज असल्याचेही तिने स्पष्ट केले.

जान्हवीने सांगितले की, तिला त्वचेशी संबंधित समस्या आहेत आणि बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर पाण्यामुळे तिच्या त्वचेवर परिणाम होतो. यासाठी तिला विशेष काळजी घ्यावी लागते. याच संदर्भात तिने आपल्या जुन्या अनुभवाबद्दलही सांगितले.

‘पाण्यामुळे माझ्या त्वचेवर परिणाम झाला’

जान्हवीने 2020 मधील एक प्रसंग सांगताना काही जुने फोटोही शेअर केले. मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्याबाहेर राहत असताना तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स आले होते. डॉक्टरांकडे गेल्यानंतर पाण्यामुळे त्वचेवर परिणाम होत असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे तिने सांगितले.या त्वचेच्या समस्येमुळे शूटिंगदरम्यान मेकअपने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स लपवावे लागत होते. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मालिका सोडावी लागली आणि त्वचेवर उपचार करण्यासाठी मोठा खर्च झाल्याचेही जान्हवीने सांगितले.अभिनेत्रीने स्पष्ट केले की, त्वचेची काळजी घेण्यासाठी ती काही गोष्टी कटाक्षाने पाळते. अभिनेत्री म्हणून दिसण्याबाबतही आपल्यावर एक प्रकारचा दबाव असतो, त्यामुळे त्वचेची काळजी घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे तिने म्हटले.

‘कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे, माझी स्किन वाईट आहे’

बिस्लेरीच्या बाटलीवरून होत असलेल्या ट्रोलिंगवर जान्हवीने संताप व्यक्त केला. एका बाटलीच्या पाण्याची किंमत फार मोठी नसल्याचे सांगत तिने केवळ या एका वाक्यावरून आपल्याला ट्रोल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.तसेच कोल्हापूरच्या पाण्याबद्दल आपल्याला कोणतीही तक्रार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. ‘कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे, आपली स्किन वाईट आहे, त्याचं काय करणार’, असं म्हणत तिने आपल्या वक्तव्याचा संदर्भ स्पष्ट केला.जान्हवीने पुढे सोशल मीडियावरील ट्रोलिंगवरही भाष्य केले.

एखाद्या महिलेचा अपमान करून केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे तिने म्हटले.कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा लाभला असल्याचा उल्लेख करत महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जाते, असेही जान्हवीने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले. केवळ एका वक्तव्याच्या छोट्या क्लिपवरून गैरसमज निर्माण झाल्याचे म्हणत तिने संपूर्ण पॉडकास्ट पाहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button