मनोरंजन

अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला भारतीय सिनेसृष्टीतील हा दिग्गज अभिनेता, मराठमोळ्या पाहुणचारात रंगल्या गप्पा

नव्वदच्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे आजही चाहत्यांच्या मनात तितक्याच लोकप्रिय आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘शाबास सुनबाई’, ‘घोलात घोल’, ‘कळत नकळत’ आणि ‘धडाकेबाज’ यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे.

अश्विनी भावे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वास्तव्यास आहेत. अभिनयाच्या क्षेत्रापासून काहीशा दूर असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. परदेशात राहूनही मराठी संस्कृती आणि परंपरांशी असलेलं त्यांचं नातं आजही कायम आहे.

नुकतीच त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि त्यांच्या ‘जाने पहचाने अनजाने’ या नाटकाची टीम पोहोचली. अनुपम खेर सध्या या नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्याचदरम्यान त्यांनी अश्विनी भावे यांची भेट घेतली.

या खास भेटीसाठी अश्विनी भावे यांनी अनुपम खेर, अभिनेत्री स्वरूप संपत आणि नाटकाच्या टीममधील इतर सदस्यांसाठी खास लंचचं आयोजन केलं होतं. सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला आणि निवांत वातावरणात गप्पा, हास्यविनोद करत वेळ घालवला. या खास क्षणांचे काही फोटो अश्विनी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या भेटीनंतर अश्विनी भावे यांनी अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचं आणि त्यांच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाचं कौतुक केलं. चित्रपट, रंगभूमी आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये सातत्याने काम करत असतानाही नव्या गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला सतत नव्या पद्धतीने सादर करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं.

अश्विनी यांच्या मते, कलाकारासाठी केवळ यश महत्त्वाचं नसून आपल्या कामाबद्दलची उत्सुकता आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड अधिक महत्त्वाची असते. अनुपम खेर यांच्यात ही जिज्ञासा आजही कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अश्विनी भावे यांच्या घरी कलाकार आणि मित्रमंडळींच्या होणाऱ्या भेटी सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतात. अनुपम खेर यांची ही भेटदेखील त्यापैकीच एक ठरली आहे.

Related Articles

Back to top button