मनोरंजन

Prahaar Trailer : राजकुमार राव साकारणार उज्ज्वल निकम; ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’चा दमदार ट्रेलर रिलीज

पंकज राणे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या आगामी ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राजकुमार राव देशातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आला.

कसा आहे ट्रेलर?

‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटातून २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची कहाणी मांडण्यात आली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी केलेला कायदेशीर लढा आणि दहशतवाद्यांविरोधात पुरावे सादर करताना त्यांनी बजावलेली भूमिका ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच राजकुमार राव कोर्टात एका लहान मुलीशी संवाद साधताना आणि २६/११ हल्ल्यादरम्यान घडलेल्या घटनांबाबत तिची विचारपूस करताना दिसतात. त्यानंतर या खटल्यातील महत्त्वाच्या घटनांची झलक प्रेक्षकांसमोर येते. मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला न्यायालयाकडून शिक्षा मिळवून देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी केलेल्या कायदेशीर प्रयत्नांवर चित्रपटाची कथा केंद्रित असल्याचं ट्रेलरवरून दिसतं.

यासोबतच तरुणांच्या मनात दहशतवाद आणि हिंसेचं विष पेरण्यामागील कटकारस्थानाचाही कथानकात समावेश असल्याचं ट्रेलरमधून समोर येतं. अभिनेता ललित प्रभाकर कसाबच्या भूमिकेत दिसत असून, त्याचा लूक आणि अभिनय लक्ष वेधून घेत आहे. रोमँटिक भूमिकांसाठी ओळखला जाणारा ललित प्रभाकर या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Trailer Link :

राजकुमार रावचा वेगळा अंदाज

उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेसाठी राजकुमार राव यांनी आपल्या लूक आणि देहबोलीवर विशेष मेहनत घेतल्याचं ट्रेलरमधून जाणवतं. गंभीर आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात राजकुमार राव यांच्यासोबत वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केलं आहे. अविनाश अरुण यांनी यापूर्वी ‘किल्ला’, ‘थ्री ऑफ अस’ आणि ‘पाताल लोक’ यांसारख्या प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे.

‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २६/११ हल्ल्याच्या खटल्याची कहाणी मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीने मांडली जाते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Back to top button