Jahnavi Killekar Kolhapur Shooting :‘सायको रंगा’च्या शूटिंगचा जान्हवी किल्लेकरने सांगितला भन्नाट किस्सा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सायको रंगा’ ( Psycho Ranga Marathi Movie ) या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात स्मिता गोंदकर, जान्हवी किल्लेकर, सुबोध भावे, पुष्कर जोग आणि मिलिंद शिंदे यांसारखे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. 25 सप्टेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून, सध्या कलाकारांकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
याच प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगितला, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
‘बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केली’
‘सायको रंगा’च्या शूटिंगसाठी कोल्हापूरला गेलेल्या जान्हवी किल्लेकरने तिथल्या पाण्यामुळे आपल्याला झालेल्या अडचणींबद्दल सांगितलं. त्वचेशी संबंधित समस्या असल्यामुळे बाहेरच्या ठिकाणी गेल्यावर तिथलं वातावरण आणि पाणी आपल्याला लगेच सूट होत नसल्याचं तिने सांगितलं.
याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, “कोल्हापुरात शूटिंग करताना मी बिस्लेरीच्या पाण्यानेच अंघोळ करते.” कोल्हापूरचं पाणी चांगलं असलं तरी आपल्या त्वचेला ते सूट होत नसल्याने हा उपाय करावा लागल्याचं तिने सांगितलं.पुढे ती म्हणाली, “मी अंघोळ चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली. मोठ्या मोठ्या पाण्याच्या बॉटल आणायचे, तेही मी माझ्या खर्चातून.” तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
‘कोल्हापूरचं पाणी मला सूट होत नाही’
जान्हवीने सांगितलं की, मुंबईच्या पाण्याची तिला सवय झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरला शूटिंगसाठी जाताना त्वचेच्या समस्यांबाबत तिला आधीपासूनच चिंता होती. बाहेरच्या ठिकाणचं वातावरण आणि पाणी पटकन न जुळल्याने तिने बिस्लेरीच्या पाण्याचा वापर केल्याचं सांगितलं.
दरम्यान, अभिनेता पुष्कर जोगयानेही यापूर्वी ‘सायको रंगा’च्या शूटिंग आणि चित्रपटाबद्दल काही किस्से शेअर केले आहेत.
काय आहे ‘सायको रंगा’ची कथा?
‘सायको रंगा’ हा दमदार अॅक्शन, गूढ कथानक आणि भावनिक संघर्षाची सांगड घालणारा मराठी चित्रपट आहे. चित्रपटातील ‘रंगा’ हे मुख्य पात्र अन्यायाविरोधात उभं राहणारं आणि रोबिन हूडसदृश व्यक्तिमत्त्व असलेलं दाखवण्यात आलं आहे.रंगा खरंच ‘सायको’ आहे की परिस्थितीने त्याला तसं बनवलंय? याचं उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे. 25 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीच्या कथानकाची अपेक्षा आहे.



