Phulwara Marathi Movie : रवी जाधवांच्या दिग्दर्शनात ‘फुलवरा’ खुलणार! ‘या’ तारखेपासून लावणीचा जल्लोष

मुंबई : लावणीचा ठेका, लोककलेचा बाज आणि अस्सल मराठी मातीचा गंध घेऊन झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नटरंग’नंतर तब्बल १६ वर्षांनी ही जोडी लावणीप्रधान चित्रपट घेऊन येत असून ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना ‘फुलवरा’चे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये पूजेच्या ताटात विराजमान असलेला देवी अंबाबाईचा मुखवटा पाहायला मिळतो. ‘आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या आणि अस्सल मराठी लावणीला बळ द्या’ ही टॅगलाईन चित्रपटाच्या विषयाची झलक देत आहे. त्यामुळे पारंपरिक लावणीचा बाज आणि आजच्या काळाशी तिचं नातं चित्रपटातून कशा पद्धतीने मांडलं जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘फुलवरा’ची कथा नेमकी कोणत्या वळणावर जाणार, लावणी कलावंतांच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा कोणता पैलू यातून समोर येणार, याबाबतची माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. चित्रपटातील कलाकारांची नावेही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
लोककलेच्या क्षेत्रात आपल्या वेगळ्या सादरीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय या संगीतकार जोडीने चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘फुलवरा’बद्दल बोलताना ‘नटरंग’नंतर तब्बल सोळा वर्षांनी पुन्हा एकदा तमाशापट करण्याचं धाडस करत असल्याचं सांगितलं. तमाशा ही महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख असून लावणी ही त्या लोककलेची महत्त्वाची परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘नटरंग’ची कथा सत्तरच्या दशकात घडते, तर ‘फुलवरा’ची कथा २०१५ मधील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दशकांत तमाशा काळानुरूप बदलला असला, तरी आपली ‘अस्सल मराठी’ कला जपण्यासाठी कलावंतांची धडपड आणि त्यांचा संघर्ष आजही कायम असल्याचं रवी जाधव यांनी म्हटलं आहे.झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’१४ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. कलाकारांची मांदियाळी, लावणीचा नेमका कोणता रंग आणि पडद्यामागची कहाणी काय असेल, याची उत्सुकता आता वाढली आहे.



