Congress Rally : राहुल गांधींच्या महारॅलीमुळे व्यापाऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका?

नवी दिल्ली : मतचोरी, मतदार यादीतील विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने दिल्लीत काढलेल्या महारॅलीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर झालेल्या या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा दिल्लीतील व्यापारी संघटनेने केला आहे. या रॅलीमुळे तब्बल ११ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत संबंधित आयोजकांकडून भरपाई मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
काँग्रेसला सुरुवातीला जंतरमंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर रामलीला मैदानावर महारॅली घेण्यास प्रशासनाने मान्यता दिली. मात्र, या कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. नागरिकांची ये-जा कमी झाल्याने दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.
या वादात सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचीही भर पडली आहे. आंदोलन करण्याचा अधिकार असला, तरी त्याच्या नावाखाली सार्वजनिक जागेवर अनिश्चित काळासाठी ताबा मिळवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाच्या या भूमिकेचे व्यापारी संघटनेने स्वागत केले आहे. सार्वजनिक जागांवरील आंदोलनांमुळे सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
CTI ने दिल्ली प्रशासनाशी पत्रव्यवहार करून महारॅलीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाप्रमाणे दिल्लीतही आंदोलन किंवा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे व्यावसायिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत स्वतंत्र कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना आंदोलन आणि मोर्चे काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, त्यासाठी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणे किंवा व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणे योग्य नाही. मोठ्या सभांमुळे वाहतुकीचे मार्ग बंद होतात, ग्राहक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्याचा थेट परिणाम उलाढालीवर होतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या आयोजकांवर नुकसानभरपाईची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी पुढे आली आहे.
याशिवाय दिवाळीच्या दहा दिवसांच्या कालावधीत रामलीला मैदान, जंतरमंतर, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि दिल्ली गेट यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांना ‘No Protest Zone’ घोषित करावे, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. अशा वेळी आंदोलनांमुळे व्यापारावर परिणाम होऊ नये, हा त्यामागील उद्देश असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, या आरोपांवर काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. महारॅलीपूर्वी राहुल गांधी यांनी आंदोलनासाठी येणाऱ्या नागरिकांना बाजारपेठांमधून थोडीफार खरेदी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता याच महारॅलीच्या आयोजनावरून व्यापाऱ्यांनी नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय आंदोलन आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांचा नवा संघर्ष समोर आला आहे.
आंदोलनाचा अधिकार विरुद्ध व्यापाराचे नुकसान, असा हा वाद आता दिल्लीच्या राजकीय आणि व्यापारी वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.



