Viral Video Controversy : थट्टा-मस्करी की गैरवर्तन? काँग्रेस खासदाराच्या व्हिडीओने नवा वाद

प्रशांत गोडसे
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘देश बचाव, संविधान बचाव’ रॅलीपूर्वी खासदारांच्या बसमधील एका घटनेने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण केला आहे. काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर थट्टा-मस्करीत चापट मारल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे काँग्रेसमधील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीमध्ये १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने ‘देश बचाव, संविधान बचाव’ महारॅलीचे आयोजन केले होते. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसह निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात ही रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी खासदार बसमधून जात असताना हा प्रकार घडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
बस प्रवासादरम्यान खासदार श्यामकुमार बर्वे आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात हसत-खेळत संवाद सुरू होता. त्याचवेळी बर्वे यांनी धानोरकर यांच्या गालावर चापट मारल्याचे चित्रफितीत दिसते. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य नेतेही बसमध्ये उपस्थित होते. हा व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकेची संधी साधली आहे.
काँग्रेसची रॅली संविधान आणि महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर असताना पक्षाच्या खासदारांकडूनच असे वर्तन होत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. आंदोलनाच्या गांभीर्यावरही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय आंदोलनाला या व्हिडीओमुळे वेगळे वळण मिळाले आहे.
तक्रारीनंतर पक्षनेतृत्वाची भूमिका काय?
या प्रकरणात प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः कोणतीही अधिकृत तक्रार केल्याचे समोर आलेले नाही. मात्र, काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी या घटनेबाबत आक्षेप नोंदवला आहे. ई-मेलद्वारे खर्गे आणि राहुल गांधी यांच्याकडे तक्रार पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत या प्रकरणाची दखल घेतली जाणार का आणि संबंधित खासदाराला काही समज दिली जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
श्यामकुमार बर्वे यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, खासदार श्यामकुमार बर्वे यांनी या वादावर आपली बाजू मांडली आहे. प्रतिभा धानोरकर या आपल्याला लहान बहिणीसारख्या आहेत. बसमध्ये सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत होते. त्यावेळी सहज थट्टा-मस्करीतून हा प्रकार घडला. त्यात कोणताही गैरहेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात पक्षाकडून विचारणा झाली असता, आपल्याला आलेली तक्रार बनावट ई-मेलवरून करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा दावाही बर्वे यांनी केला. एका सहज घडलेल्या प्रसंगाचे विनाकारण राजकारण केले जात असून, काँग्रेसचे आंदोलन बदनाम करण्यासाठी हा मुद्दा उचलला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र, बर्वे यांच्या स्पष्टीकरणानंतरही हा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. व्हिडीओच्या आधारे भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य केले जात असताना, पक्षांतर्गत तक्रारीमुळे काँग्रेस नेतृत्वाचीही कसोटी लागली आहे. त्यामुळे या प्रकरणात खर्गे आणि राहुल गांधी काय निर्णय घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



