मुंबई

मुंबईत गणेशोत्सव निर्विघ्न, १ लाख ९९ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन.

मुंबई : मुंबईकरांचा यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत झाला.मुंबई महापालिकेचां सुनियोजितपणा पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि मुंबईकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद द श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. यावर्षी गणेशोत्सवात दीड दिवस, पाच, सहा, सात आणि अकरा दिवसांच्या उत्सवांतील मिळून एकूण १ लाख ९९ हजार १८५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १० हजार ४२१ सार्वजनिक, १ लाख ८२ हजार ०२९ घरगुती आणि ६ हजार ७३५ गौरी-हरतालिका मूर्तींचा समावेश आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ३६ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाले. यात ७ हजार ०२५ सार्वजनिक, २८ हजार ६५५ घरगुती आणि ५६० गौरी-हरतालिका मूर्तींचा समावेश आहे. दिवसनिहाय आकडेवारीनुसार दीड दिवसांच्या ६२ हजार ७६२, पाच दिवसांच्या ३७ हजार ०६९, सहा दिवसांच्या ४४ हजार २८६, सात दिवसांच्या १८ हजार ८२८ आणि अकरा दिवसांच्या ३६ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाले.

कृत्रिम तलावांना मुंबईकरांचे प्राधान्य

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला यंदाही मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणपूरक मूर्तींसाठी ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मोफत उपलब्ध करून देण्यात आला.

यंदा महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती, एक झाड’ उपक्रमही राबविण्यात आला. विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

२५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची यंत्रणा

विसर्जन सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पालिकेचे २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. विविध ठिकाणी १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. १ हजार १३२ जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. रात्रीच्या विसर्जनासाठी ६ हजार ५२ फ्लडलाईट आणि सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दी व्यवस्थापनासाठी २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले होते.

गिरगाव चौपाटीवर विशेष बंदोबस्त

स्वराज्यभूमी अर्थात गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. येथे १२ कृत्रिम तलाव, २० निरीक्षण मनोरे, २२ तराफे, ९० प्रसाधनगृहे आणि सुमारे २ हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आला होता. या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील ७२५ स्वयंसेवकांना प्रथमोपचार आणि सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह विविध राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि परदेशी नागरिक उपस्थित होते.

९३४ मेट्रिक टन निर्माल्य संकलित

गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य संकलनासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष व्यवस्था केली होती. विविध विसर्जनस्थळी ६१३ निर्माल्य कलश आणि ८३८ निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. २६ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत ९३४.२६ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त, नागरिक, स्वयंसेवक, मुंबई पोलीस तसेच विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांचे महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button