मुंबई

सीएसएमटी रेल्वे सुरक्षा पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू;CID करणार तपास

नातेवाईकांकडून मारहाणीचा आरोप.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमरान शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
रोजगाराच्या शोधात तो दोन तीन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.१८ वाजता इमरान CSMT मुख्य RPF पोस्टवर खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती विचारण्यासाठी आला होता. त्यावेळी तो अस्वस्थ अवस्थेत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. काहीजण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तो करत होता. त्यानंतर तो आक्रमक झाल्याचे RPFकडून सांगण्यात आले.

RPFच्या माहितीनुसार, इमरानने RPFचे SI अनिकेत यांच्यावर हल्ला केला तसेच स्वतःलाही इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला स्वतःला किंवा इतरांना इजा होऊ नये, यासाठी आवरण्यात आले.

सुमारे १२.३० वाजता इमरानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सात ते आठ मिनिटे कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी इमरान आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुपारी १२.५४ वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर GRPकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इमरानच्या नातेवाईकांनी मात्र रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी केली जात आहे.

इमरानकडे सापडली दोन रेल्वे तिकिटे
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, इमरानकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नाही. मात्र, त्याच्याकडे रेल्वेची दोन जनरल तिकिटे सापडली. त्यापैकी एक तिकीट १८ सप्टेंबर २०२६ रोजीचे खंडवा-भुसावळ, तर दुसरे १९ सप्टेंबरचे नाशिक-दादर प्रवासाचे आहे.

इमरानचा फोटो ओळख पटवण्यासाठी भुसावळ विभाग तसेच स्थानिक पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे. तो मुंबईत नेमका कोणत्या कारणासाठी आला होता आणि त्याच्या मुंबईतील हालचाली काय होत्या, याचाही तपास सुरू आहे.

CIDकडून तपास; CCTV आणि पोस्टमार्टम अहवाल महत्त्वाचा
RPFच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या CIDकडे सोपवण्यात आला आहे. CID कोकण रेंजचे SP प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे.

इमरानच्या मृतदेहाचे जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. पोस्टमार्टम अहवाल आणि घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या आधारे इमरानच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्या वेळी घडलेल्या घटनाक्रमाची अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button