मुंबई

यारी रोड-लोखंडवाला बॅक रोड उड्डाणपूल डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करा

मुंबई : अंधेरी पश्चिमेतील यारी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शनदरम्यान कवठे खाडीवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. बांगर यांनी सोमवारी प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

महापालिकेच्या विकास नियोजन आराखड्यानुसार कवठे खाडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस १८.३० मीटर रुंदीचा विकास नियोजन रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, खाडीमुळे रस्ता विकसित करण्याच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने या नियोजित रस्त्याला जोडण्यासाठी खाडीवर हा पूल उभारण्यात येत आहे.

प्रस्तावित पुलामुळे यारी रोड, पंचमार्ग आणि वेसावे परिसराचा सरदार वल्लभभाई पटेल नगर, लोखंडवाला संकुल आणि समर्थनगर या भागांशी थेट संपर्क निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहतूक संपर्क अधिक सक्षम होण्याबरोबरच परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

या पुलाची एकूण लांबी २०६ मीटर असून मुख्य पुलाची लांबी ११० मीटर आणि रुंदी ११ मीटर आहे. सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या बाजूचा जोडमार्ग ४० मीटर, तर अमरनाथ टॉवरच्या बाजूचा जोडमार्ग ५६ मीटर आहे. पुलाच्या मुख्य भागासह जोडमार्गाची रुंदी समान ठेवण्यात आली आहे.

पुलासाठी ११० मीटर लांबीचा एकेरी पल्ल्याचा पोलादी ‘बास्केट हँडल आर्च’ सांगाडा उभारण्यात येणार आहे. या पोलादी कमानीला ताणताऱ्यांच्या माध्यमातून पुलाच्या डेक स्लॅबशी जोडण्यात येणार आहे. पुलाच्या अधोरचनेसाठी आरसीसी आधार भिंत व आधारमुकुट, तर पायाभरणीसाठी आरसीसी पाइल फाउंडेशनची रचना करण्यात आली आहे.

या पुलामुळे वेसावे, यारी रोड, लोखंडवाला आणि लगतच्या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या या परिसरातून प्रवासासाठी लागणारा सुमारे ३० मिनिटांचा कालावधी पुलामुळे सुमारे १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. आगामी वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाच्या उत्तर टप्प्याला जोडणी झाल्यानंतर हा पूल पर्यायी मार्ग म्हणूनही उपयुक्त ठरणार आहे.

Related Articles

Back to top button