मुंबई लोकल महिला अपघात: मुंब्रा-दिवा दरम्यान गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून महिला ट्रॅकवर पडली; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुंबईची ‘लाइफलाईन’ समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली असून, प्रचंड गर्दीमुळे एका उभ्या लोकल ट्रेनमधून महिला थेट रेल्वे रुळावर (ट्रॅकवर) पडली. ही संपूर्ण घटना मागच्या डब्यातील प्रवाशांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सुदैवाने, ही घटना घडली तेव्हा लोकल ट्रेन सिग्नल न मिळाल्यामुळे जागीच उभी होती, ज्यामुळे मोठा अनर्थ आणि जीवितहानी टळली. मात्र, खाली खडी आणि दगडांवर पडल्यामुळे संबंधित महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन सिग्नल न मिळाल्यामुळे मुंब्रा-दिवा दरम्यान बराच वेळ थांबून राहिली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, गाडी बराच वेळ उभी राहिल्याने पुढच्या महिला डब्यातील दोन महिला खाली उतरून ट्रॅकवरून चालत जाण्याचा प्रयत्न करत होत्या. याच दरम्यान डब्यातील प्रचंड गर्दी आणि झालेल्या धक्काबुक्कीमुळे दरवाज्यावर ऊभी असलेल्या एका महिलेचा तोल गेला आणि ती थेट दोन रुळांमधील दगडांवर खाली पडली.
मागील भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या…
मुंब्रा-दिवा दरम्यानचा हा भाग यापूर्वीही भीषण अपघातांचा साक्षीदार ठरला आहे. ९ जून रोजी सकाळी ९:२० च्या सुमारास कसारा ते CSMT आणि समोरून येणाऱ्या लोकल एकमेकांच्या जवळून जात असताना दरवाजावर लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा आणि शरीर एकमेकांना आदळले होते. या अपघातात तोल गेल्याने सुमारे आठ प्रवासी खाली पडले होते, ज्यामध्ये ६ हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ऐन गर्दीच्यावेळीर्मध्ये लोकल फेऱ्या वाढवणे, ट्रॅक फेंसिंग करणे आणि दरवाजावर लटकणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.
स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकलची प्रतीक्षा
यापूर्वीच्या दुर्घटनांनंतर सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेट्रोप्रमाणे स्वयंचलित दरवाजे असलेल्या (Closed Door) लोकल ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्या तांत्रिकदृष्ट्या सज्ज असल्या तरी, सामान्य सेवांमध्ये त्यांची पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी आणि दरवाजांवर लटकून होणारा जीवघेणा प्रवास अजूनही कायम आहे.



