मुंबई

राणीबागेची सफर महागणार? तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेची सफर आता महागण्याची शक्यता आहे. पर्यटकांसाठी सध्या आकारण्यात येणारे प्रवेशशुल्क दुप्पट करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला आहे.

सध्या राणीबागेत प्रवेशासाठी मुलांसाठी २५ रुपये, तर प्रौढांसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. प्रस्ताव मंजूर झाल्यास मुलांना ५० रुपये, तर प्रौढांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत.

राणीबागेतील पशुपक्ष्यांचे खाद्य, उपचार आणि देखभालीचा वाढता खर्च, तसेच राणीबागेचा विस्तार, प्रस्तावित पक्षी उद्यान आणि मत्स्यालयामुळे वाढणारा आर्थिक भार लक्षात घेऊन महसूल वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव पुढे आला आहे. २०१७ नंतर प्रवेशशुल्कात मोठी वाढ झालेली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राणीबागेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २५ लाख ४२ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यातून महापालिकेला ९ कोटी ८५ लाख रुपयांचा महसूल मिळाला. आता तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button