मुंबई

वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी कायदेशीर सल्लागाराची थेट नियुक्ती

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) — वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पाच्या कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी महापालिकेने निवृत्त सहविधी अधिकारी प्रीती पुरंदरे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दरमहा एक लाख रुपये मानधन देण्यात येणार असून, संबंधित प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडचे काम सात पॅकेजमध्ये सुरू असून, प्रकल्पाची मोठी व्याप्ती आणि विविध कंत्राटांमधील कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेऊन स्वतंत्र कायदेशीर सल्लागाराची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. प्रकल्पातील करार, कायदेशीर दायित्वे तसेच कंत्राटदारांकडून भविष्यात करण्यात येणाऱ्या संभाव्य दाव्यांवर कायदेशीर सल्लागाराकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

या प्रकल्पावर मुख्यमंत्री वॉररूममधूनही देखरेख केली जात असल्याने प्रकल्पातील कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नियमित निविदा प्रक्रिया राबविल्यास नियुक्तीला विलंब होऊ शकतो, असा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया शिथिल करून थेट नियुक्तीद्वारे प्रीती पुरंदरे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला आहे.

या नियुक्तीमुळे प्रकल्पाशी संबंधित करार आणि कायदेशीर बाबींवर सातत्याने देखरेख ठेवता येणार असून, कंत्राटदारांकडून उद्भवू शकणारे दावे आणि संभाव्य कायदेशीर वाद हाताळण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

Related Articles

Back to top button