मनोरंजनमुंबई

Vasai Fashion Viral Video : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? भाजी मार्केटमध्ये उतरले मॉडेल्स; वसईच्या देसी फॅशन शोचा व्हिडिओ व्हायरल

पंकज राणे

Vasai Vegetable Market Desi Fashion Show Viral Video : फॅशन शो म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो भव्य रॅम्प, महागडे डिझायनर कपडे आणि आकर्षक रोषणाई. मात्र, या सगळ्याला फाटा देत वसईतील तरुण-तरुणींनी चक्क भाजी मार्केटमध्ये अनोखा फॅशन शो साकारला आहे. भाज्या, फळे आणि बाजारपेठेतील रंगांचा कल्पक वापर करून सादर करण्यात आलेल्या या फॅशन शोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनोख्या प्रयोगाचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

वसईतील अंबाडी रोड येथील गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. व्हिजन व्होग अकॅडमीच्या 50 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या शोसाठी कोणताही भव्य रॅम्प किंवा महागड्या सजावटीचा आधार घेण्यात आला नाही. त्याऐवजी भाज्या, फळे आणि कपड्यांचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी फॅशनच्या वेगवेगळ्या शैली सादर केल्या. बाजारपेठेतील गजबज, रंगीबेरंगी भाज्या आणि फळांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केलेल्या रॅम्प वॉकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अचानक भाजी मार्केटमध्ये मॉडेल्सचा कॅटवॉक पाहायला मिळाल्याने ग्राहक आणि विक्रेत्यांसाठीही हा वेगळाच अनुभव ठरला.

वडिलांसोबत भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर सुचली कल्पना!

या अनोख्या संकल्पनेमागे व्हिजन व्होग अकॅडमीचे संस्थापक साहिल सिंग यांची कल्पकता आहे. याबाबत बोलताना साहिल सिंग यांनी सांगितले की, ते आपल्या वडिलांसोबत वसईतील भाजी मार्केटमध्ये गेले असताना त्यांना या फॅशन शोची कल्पना सुचली. फॅशन म्हटलं की भव्य रॅम्प आणि आकर्षक स्टेज डोळ्यांसमोर येतात; मात्र, फॅशनला कोणत्याही विशिष्ट जागेचं बंधन नसतं, असं त्यांचं मत आहे.

भारतीय बाजारपेठ ही संस्कृती, रंग आणि विविधतेने नटलेली आहे. याच बाजारपेठेतील भाज्या आणि फळांचा वापर करून काहीतरी नावीन्यपूर्ण सादर करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यानंतर त्यांनी ही संकल्पना कॅरिसा डीब्रिटो मॅडम यांच्यासमोर मांडली. भाज्या आणि फळांना फॅशनच्या विविध शैलींमध्ये सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. तसेच, हा उपक्रम साकारण्यासाठी रोहित चौधरी आणि जतिन गामी यांनीही मोलाची मदत केली.

‘फॅशनसाठी भव्य स्टेजची गरज नाही’

या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना साहिल सिंग म्हणाले की, “फॅशन सादर करण्यासाठी महागडे कपडे, मोठा रॅम्प किंवा भव्य स्टेज असण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे कल्पकता, सर्जनशीलता आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही जागा तुमच्यासाठी फॅशनचं व्यासपीठ बनू शकते.” या शोमध्ये 50 विद्यार्थ्यांनी कपड्यांसोबतच फळे आणि भाज्यांचा कल्पक वापर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन फॅशनकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन लोकांसमोर आणणे, हा या प्रयोगामागील मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले. फॅशन ही केवळ कपड्यांपुरती मर्यादित नसून, ती विचार आणि कल्पकतेतून व्यक्त होणारी कला आहे, हे या उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोशल मीडियावर या फॅशन शोच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी साधनांचा वापर करूनही नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणता येते, हे वसईतील या तरुणांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या हटके देसी फॅशन शोची सध्या सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे.

Related Articles

Back to top button