मुंबई

मतचोरीविरोधात चैत्यभूमीवर सत्याग्रह; ज्ञानेशकुमार यांच्या बडतर्फीची वर्षा गायकवाड यांची मागणी

मुंबई: मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या कथित भ्रष्ट कारभाराविरोधात ‘आम्ही मुंबईकर’च्या वतीने सोमवारी चैत्यभूमी येथे सत्याग्रह करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून बडतर्फ करून अटक केली जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

या सत्याग्रहाला माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार भाई जगताप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शकपणे घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे सांगितले. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी मागील काही वर्षांत त्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

विशिष्ट जाती-धर्मातील तसेच विरोधी पक्षांना समर्थन देणाऱ्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदारयादीतून वगळली जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. एसआयआरचा वापर ‘शस्त्रासारखा’ केला जात असल्याचेही त्या म्हणाल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता उघड केल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

‘संविधानाने देश चालतो’

“भारतीय संविधानाने १८ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर तो लोकशाहीसाठी गंभीर प्रश्न आहे. देश संविधानाने चालतो,” असे गायकवाड म्हणाल्या. ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटविण्याची आणि अटकेची मागणी करत हा लढा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button