१४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला स्थगितीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा — खासदार वर्षा गायकवाड

मुंबई : मुंबईतील १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या कारवाईला स्थगिती देऊन सर्व संबंधितांची बैठक घेण्याची मागणी खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार अल्सम शेख यांनी पत्रकार परिषदेत केली. कारवाईला स्थगिती न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गणपती उत्सवाच्या काळात यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्याने झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. या विषयावर महापौर, मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बैठक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई केली जाईल आणि त्यापलीकडे कोणतीही अतिरिक्त कारवाई केली जाणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच, १ ऑक्टोबरपासून अशा प्रकारची कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबईतील विविध भागांत व्यावसायिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये आणि उद्यानांसंदर्भात वेगवेगळे नियम लागू केले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने या धोरणाला विरोध दर्शविला. झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नावर समान धोरण असावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, सांताक्रूझ येथील मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेवरूनही वर्षा गायकवाड यांनी महापौरांवर निशाणा साधला. “महापौरांनी मुंबईच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. आणखी एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला आहे. वॉटर, गटर आणि मॅनहोलच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असे गायकवाड म्हणाल्या. महापौरांचे लक्ष मुंबईतील नागरी प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय राजकारणाकडे अधिक असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांच्या मुद्द्यावरही गायकवाड यांनी भाष्य केले. मतदारांना मतदानाचा अधिकार मिळतोय की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे सांगितले. आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करून त्यांना पदावरून हटविण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या वक्तव्यांवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.



