मुंबई

आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई; वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्लाबोल

‘महाराष्ट्रात संविधानाचे राज्य आहे की जंगलराज?’; काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसवण्यावर संतप्त सवाल

मुंबई : आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आले असताना रात्री काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात विश्रांती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी झोपेतून उठवून ताब्यात घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. या कारवाईवरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, “महाराष्ट्रात संविधानाचे राज्य आहे की जंगलराज? देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसवले, आम्ही वर्षा बंगल्यावर घुसायचे का?” असा संतप्त सवाल केला.

विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळताच खासदार वर्षा गायकवाड यांनी टिळक भवन येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही म्हणून ते मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घ्यायला हव्या होत्या. मात्र, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावरच पोलिसी कारवाई करण्यात आली. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; मात्र या सरकारकडून विद्यार्थ्यांना आंदोलनही करू दिले जात नाही,” असा आरोप गायकवाड यांनी केला.

काँग्रेस कार्यालयात पोलिसांनी प्रवेश केल्यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारे पोलीस कसे घुसू शकतात? टिळक भवनचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. मात्र, आज या कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. बॅरिकेड्स लावून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे,” असे त्या म्हणाल्या.

भाजप सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी विद्यार्थ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. “गुन्हेगार मंत्रालयात खुलेआम फिरतात, गुन्हेगारांचे कटआऊट लागतात आणि देवेंद्र फडणवीसांचे पोलीस विद्यार्थ्यांवर कारवाई करतात,” अशी टीका त्यांनी केली.

विद्यार्थी घाबरणार नाहीत

“भाजपा सरकारवर विद्यार्थ्यांचाही आता विश्वास राहिलेला नाही. आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तर पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या कार्यपद्धती आणि आयोगाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. आयोगाची विश्वासार्हता राहिलेली नाही,” असा आरोपही गायकवाड यांनी केला.

एमपीएससीच्या अध्यक्षांवरही त्यांनी निशाणा साधला. “एमपीएससीचा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा मित्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही,” असा दावा त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून, आपल्या हक्कांसाठी आवाज उठविण्यापासून विद्यार्थी मागे हटणार नाहीत, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button