Fishing Contract Cancelled! उजनी धरणावरील खासगी मासेमारीचा ठेका रद्द; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्याची ई-निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उजनी धरण परिसरातील हजारो मच्छीमार कुटुंबांचा मासेमारी हा पिढ्यान्पिढ्यांचा पारंपरिक व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, धरणातील मासेमारीचा खासगी ठेका देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा येण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील मच्छीमार संघटना, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती आणि उजनी मच्छीमार बचाव अभियानाने या निर्णयाला तीव्र विरोध केला होता.
खासगी ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलन करण्याची तयारी करण्यात आली होती. यापूर्वी सिंचन भवन येथे आंदोलन तसेच उजनी तलावात जलसमाधी आंदोलनही करण्यात आले होते.
मच्छीमारांच्या या आंदोलनाची दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खासगी मासेमारी ठेका प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन ती रद्द करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. मच्छीमारांची उपजीविका आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
याच पार्श्वभूमीवर आज संबंधितांची बैठक घेण्यात आली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्याची ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस हर्षवर्धन पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार संजय शिंदे, प्रधान सचिव एकनाथ डवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. चोपडे, जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये उज्वला परदेशी, संजय दरदरे, चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, अनिल नगरे, सिताराम नगरे, नंदकुमार नगरे, लक्ष्मण शिर्के, नितीन ईरीचे, युवराज नगरे, नवनाथ परदेशी आदींचा समावेश होता.
खासगी मासेमारी ठेका रद्द झाल्याने इंदापूर तालुक्यासह उजनी धरण परिसरातील हजारो मच्छीमार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पारंपरिक मासेमारी व्यवसायावर आलेले संकट दूर झाल्याने मच्छीमार बांधवांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले.



