मुंबई

अन्न व औषध प्रशासनाच्या १२ अधिकाऱ्यांवर निलंबन, विभागीय चौकशीचा प्रस्ताव

मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून राज्यात अन्नभेसळीविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) काही अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर काही जननी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, अकोला आणि बुलढाणा येथील १२ अधिकाऱ्यांविरोधात निलंबन आणि विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे २५ मे रोजी स्वीकारल्यानंतर अन्नभेसळीविरोधातील तपासण्या आणि कारवाही करण्याला वेग दिला. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टपर्यंत राज्यात १२ हजार ८३ तपासण्या करण्यात आल्या असून, ५ हजार २६९ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच ६०३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.राज्याभारतील अनेक जिल्हासह पुणे विभागातही मोठ्या प्रमाणावर तपासनी आणि कारवाई करण्यात आली. मात्र, काही प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित झाल्याची चर्चा आहे. काही तक्रारी आणि नमुना तपासणीची प्रकरणे अपेक्षित पद्धतीने पुढे नेण्यात आली का, याबाबत प्रशासनाने अंतर्गत पातळीवर माहिती संकलित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात बाहेरील जिल्ह्यांतून आलेले पनीर आणि खवा जप्त करण्याची कारवाई सांगलीच्या पथकाने केली होती. त्यामुळे स्थानिक पथकाच्या कामकाजाबाबतही चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, १२ अधिकाऱ्यांविरोधात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावातील नेमके आरोप अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. शासनाकडूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरील आरोपांची सत्यता विभागीय चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Back to top button