महाराष्ट्रमुंबई

HIGH VOLTAGE POLITICS! आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस विरुद्ध सरकार; ‘वर्षा’ घेरावाचा इशारा

प्रशांत गोडसे

मुंबई : नाशिकहून पायी मोर्चा काढून मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात आश्रय घेतला होता. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी टिळक भवनमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या कारवाईवरून काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, अटक केलेल्या विद्यार्थ्यांची आणि NSUI पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यार्थ्यांची सुटका न झाल्यास काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालतील, असा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांनी अशा पद्धतीने प्रवेश करून केलेली कारवाई दडपशाहीचे लक्षण असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.

‘विद्यार्थ्यांचा आवाज दडपू देणार नाही’

नाशिकहून मुंबईत आलेले आदिवासी विद्यार्थी टिळक भवन येथे मुक्कामी असताना पोलिसांकडून त्यांना धमकावून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असेल तर ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

‘आंदोलनाचा अधिकार हिरावून घेता येणार नाही’

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या कारवाईचा निषेध केला. आंदोलन करणे, सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवणे आणि मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी सरकारने त्यांच्या प्रश्नांवर संवाद साधला पाहिजे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. ही दडपशाही असून ती काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

‘न्याय मागणे गुन्हा आहे का?’

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर टीका केली. आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाशिकहून पायी मुंबईपर्यंत आलेले विद्यार्थी टिळक भवन येथे मुक्कामी असताना पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद साधावा. त्यांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी पोलिसांच्या बळाचा वापर का केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीत प्रश्न विचारणे, न्याय मागणे किंवा आंदोलन करणे हा गुन्हा नाही. सरकारच्या या भूमिकेचा काँग्रेस तीव्र निषेध करत असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्यात पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे थोरात यांनी म्हटले.

NSUI पदाधिकाऱ्यांनाही अटक

दरम्यान, पोलिसांनी NSUI अध्यक्ष सागर साळुंखे तसेच मुंबई NSUI अध्यक्षांना अटक केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या सर्वांची तात्काळ सुटका करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून आता काँग्रेस आणि सरकार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button