मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी – खा. वर्षा गायकवाड

केंद्र व राज्य सरकारप्रमाणे आता महानगरपालिकेचेही लाडक्या मित्रासाठी काम, मुंबईतून गरिबांना बाहेर हाकलण्याचा डाव, आधी पुर्नवसन करा ..
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने १४ फुटांवरील झोपडपट्ट्यांमधील निवासी बांधकाम पाडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महानगपालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेनेने १८ फुटांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती मग आताच काय झाले की १४ फुटांवरील बांधकाम तोडण्याचा निर्णय घेतला, हा तुघलकी निर्णय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका हद्दीत ९० लाख झोपडीधारक असून मुंबईचा २४ टक्के भूभाग झोपड्यांनी व्यापला आहे. मुंबईच्या एकूण लोकसंख्येशी झोपडपट्टीवासीयांचे प्रमाण ५० टक्के आहे. मुंबई ही गोरगरीब कष्टकरी लोकांच्या घामावर चालते. पण भाजपा महायुती सरकारला ही गोरगरिब जनताच नकोशी झाली आहे असे दिसते. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे, हे सरकार फक्त आपल्या लाडक्या मित्रांसाठी काम करत आहे, आता हाच कित्ता महानगरपालिका गिरवत आहे. १ ऑक्टोबरपासून झोपडपट्टी तोडण्याची ही कारवाई म्हणजे गरिब झोपडपट्टीवासियांना मुंबईतून कायमचे हद्दपार करण्याचा मोठा डाव आहे. मुंबईतून स्थानिक लोकांना, भूमिपुत्रांना, गरिबांना, कष्टकरी लोकांना मुंबईतून हाकलण्याचे एक मोठे षडयंत्र मागील काही वर्षापासून जाणीवपूर्वक राबविले जात आहे.
धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीकरांना मुंबईबाहेर हाकलण्याचे काम सुरु असताना आता गोरगरिब झोपडट्टीधारकांना बेघर करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अदानीसाठी हेच भाजपा महायुतीचे सरकार व बीएमसीने सर्व नियम बदलून त्यांच्यासाठी सोयीचे नियम बनवते, त्यांचे आलिशान टॉवर उभे रहावेत यासाठी मोकळी मैदाने, क्रिडांगणे, मीठागरे, मदर डेअरीची जागा, डंपिंग ग्राऊंड, विमानतळाशेजारील जागा, सर्व भूखंड अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई आता मुंबईकरांची राहिली नाही, सर्व मुंबई फक्त अदानीची करण्याचा विडाच भाजपा महायुती सरकारने उचलला आहे व त्याला महानगरपालिकाही हातभार लावत आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेना (शिंदे) यांनीही यावर खुलासा करावा असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
झोपडपट्टीधारकांना बेघर करण्याआधी त्यांचे योग्य ठिकाणी पूनर्वसन केले पाहिजे, पण सत्ताधारी भाजपा महायुतीला मात्र त्यांचे काहीही पडलेले नाही. भाजपा सरकार हे फक्त ‘हम दो, हमारे दो’ साठीच काम करत आहे, गरिबांच्या घरावर बुलडोझर फिरवून त्यांना मुंबईतून हाकलून लावण्यास काँग्रेसचा विरोध आहे. आधी त्यांचे पुनर्वसन करा व मगच कारवाई करा, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.



