महाराष्ट्रमुंबई

Thane Murder ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्याची निर्घृण हत्या

दुचाकीवरून आलेल्या दोघांचा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, एकाला ताब्यात घेतल्याची माहिती

ठाणे, दि. ३० : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबार तसेच कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा येथील गणेशनगर परिसरात घडली. या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान, या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पप्या शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पूर्णेकर यांचे गणेशनगर परिसरात कार्यालय आहे. मंगळवारी रात्री ते काही सहकाऱ्यांसह कार्यालयात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पूर्णेकर यांना दोन गोळ्या लागल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात येत आहे.

गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले होते. जखमी अवस्थेतील पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यापैकी पप्या शिंदे याला ताब्यात घेण्यात आले असून, अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे समजते. हत्येमागील नेमके कारण आणि या गुन्ह्यातील इतर आरोपींची भूमिका तपासण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Related Articles

Back to top button