मुंबई

Thackeray Brothers Unite; भायखळ्यापासून BMC मुख्यालयापर्यंत मोर्चा,हातात फक्त तिरंगा

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महामोर्चाची घोषणा केली . ४ ऑक्टोबरला मुंबईत हा मोर्चा काढण्यात येणार असून, भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीजवळून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल. तेथे सभेने मोर्चाची सांगता होणार आहे.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी राज आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरच्या मोर्चाची सविस्तर माहिती दिली.

सकाळी १० वाजता जमणार; ११ वाजता मोर्चाला सुरुवात

‘४ ऑक्टोबरला आमचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. सकाळी १० वाजता सर्वांनी भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीजवळ जमायचे. त्यानंतर सकाळी ११ ते ११.३०च्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचल्यानंतर तेथे व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल आणि सभेने आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे.

‘आता काही बोलणार नाही; ४ तारखेलाच सगळं सांगू’

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. ‘जे काही बोलायचे आहे ते मोर्चाच्या दिवशीच बोलू. आता काही बोलणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली.

निवडणूक आयोगाच्या कारभारावर आपण गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मतदानातील कथित गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘हा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या अपमानाच्या विरोधात आहे. याबाबत ४ तारखेलाच सविस्तर बोलू,’ असे राज ठाकरे म्हणाले.

‘राजकीय झेंडे नको; फक्त तिरंगा’

४ ऑक्टोबरच्या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे आणू नयेत, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सहभागींच्या हातात फक्त तिरंगा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘हा मोर्चा राजकीय नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय आहे. त्यामुळे कोणतेही राजकीय झेंडे आणले जाणार नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत,’ असे राज ठाकरे यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन करणार

या मोर्चात इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही सहभागी करून घेणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पत्र पाठवण्याऐवजी थेट फोन करून सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचे स्पष्ट केले.

SIRच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केली असून, इतर राजकीय पक्षांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

४ ऑक्टोबरच्या मोर्चाकडे लक्ष

SIR आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वातावरण तापले असताना ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाची घोषणा झाली आहे. ४ ऑक्टोबरच्या मोर्चात राज आणि उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button