IIT मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणात मोठी अपडेट; परीक्षा केंद्रातील CCTV फुटेज समोर

परीक्षेच्या शेवटच्या १५ मिनिटांचा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; साहिलकडे मोबाईल असल्याचे दिसले, प्राध्यापकांनी घेतले बाजूला
मुंबई : IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेदरम्यान घडलेल्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये परीक्षेच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये साहिल परीक्षा केंद्रात बसलेला दिसत असून, तो खिशाकडे पाहताना दिसतो. त्यानंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला साहिलजवळ येऊन त्याच्याशी संवाद साधताना दिसतात.
मिळालेल्या माहितीनुसार, हा घटनाक्रम दुपारी साडेबारा ते पावणे एक या सुमारास घडला. परीक्षा दुपारी एक वाजता संपणार होती. फुटेजमध्ये प्राध्यापक साहिलकडून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका घेताना तसेच त्याला इतर विद्यार्थ्यांपासून बाजूला नेताना दिसत असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर साहिल परीक्षा हॉलमधून बाहेर पडताना दिसतो.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. परीक्षा केंद्रातील सीसीटीव्हीसोबतच IIT मुंबई परिसरातील अन्य कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. तपास यंत्रणा साहिल परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या हालचालींचा क्रम जोडण्याचा प्रयत्न करत आहे. उपलब्ध माहितीनुसार, तो सुमारे १.२५ वाजता वसतिगृहातील खोलीत पोहोचल्याचे सीसीटीव्हीमधून तपासले जात आहे.
दरम्यान, साहिलच्या कुटुंबीयांनी संस्थात्मक छळ आणि जातीय भेदभावाचे आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून विविध पैलूंचा तपास केला जात आहे. मात्र, परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा घटनाक्रम स्वतःहून साहिलच्या मृत्यूमागील कारण किंवा कोणाचीही जबाबदारी निश्चित करत नाही. त्या दृष्टीने तपासातील इतर पुरावे आणि जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.



