मुंबई

एसटीने पीएफची रक्कम कापली, पण ट्रस्टमध्ये जमा केली नाही; 1,000 कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून अग्रिम नाही

मुंबई: एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कापूनही ती ट्रस्टमध्ये जमा न केल्याने निधीचा खडखडाट झाला असून, सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पीएफची अग्रिम रक्कम मिळालेली नाही, असा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पीएफ ट्रस्ट असून, गेल्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली अंदाजे 1,500 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाने ट्रस्टमध्ये जमा केलेली नसल्याचा दावा बरगे यांनी केला.

या संदर्भात यांनी एसटीच्या भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली संपूर्ण रक्कम तात्काळ ट्रस्टमध्ये जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पीएफ ट्रस्टमध्ये जमा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रकमेतून त्यांना गरजेच्या वेळी नियमानुसार अग्रिम रक्कम घेता येते. मात्र, महामंडळाने कपात केलेली रक्कम ट्रस्टमध्ये जमा न केल्याने ट्रस्टला त्या रकमेवरील व्याजापासूनही वंचित राहावे लागत आहे.

ट्रस्ट ठेवींवरील व्याजाच्या उत्पन्नावर चालत असल्याने महामंडळाकडून रक्कम जमा न झाल्याचा परिणाम ट्रस्टच्या आर्थिक स्थितीवर झाला असल्याचा दावा त्यांनी केला.

जुलै आणि ऑगस्ट 2026 मध्ये पीएफ अग्रिमची मागणी केलेल्या सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना अद्याप त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम ही त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित असल्याने ती विलंब न करता ट्रस्टमध्ये जमा करावी आणि प्रलंबित अग्रिम अर्जांची रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी बरगे यांनी निवेदनातून केली आहे.

Related Articles

Back to top button