मुंबई

ST Smart Card Issue : ‘अभिजात’ मराठी, पण एसटीच्या कार्डवर मात्र इंग्रजीच!

मुंबई : एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना देण्यात येणाऱ्या सवलत ओळखपत्रांवरील माहिती केवळ इंग्रजीत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा ‘सुराज्य अभियान’ने केला आहे. ही ओळखपत्रे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये देण्यात यावीत, अशी मागणी अभियानाच्या वतीने एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.

याबाबत ‘सुराज्य अभियान’ने एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे अभियानाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबतचे नियम तसेच मराठीला मिळालेला ‘अभिजात भाषा’ दर्जा लक्षात घेता एसटीची सवलत ओळखपत्रे द्विभाषिक असणे आवश्यक आहे, असे अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी सांगितले.

सर्व सवलत ओळखपत्रांवर प्रवाशांचे नाव, इतर आवश्यक तपशील आणि नियम मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असावेत. तसेच संगणकीय प्रणालीमध्ये देवनागरी लिपीतील माहितीला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button