ST Bank मधील कथित गैरव्यवहार उघडकीस येणार. सहकार विभागाची चौकशी सुरू?

मुंबई : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेतील कथित आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने मुंबई जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना पत्र पाठवून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या तक्रारीचा संदर्भ दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सहकार विभागाने मुंबई जिल्हा उपनिबंधकांना तक्रारीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची तातडीने चौकशी करून संबंधित कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अभिप्रायाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे.
तक्रारीनुसार, बँकेतील नोकरभरतीच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच बँकेच्या ठेवींमध्ये घट, संचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेला खर्च, सुमारे 50 शाखांमधील फर्निचरची नव्याने खरेदी आणि दुरुस्तीच्या कामातील कथित अनियमितता तसेच नव्याने खरेदी केलेल्या सॉफ्टवेअरबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
बँकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्त करून त्यांच्यामार्फत कथित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय न्यायालयीन प्रकरणांमध्ये अवास्तव शुल्क देण्यात आल्याचा तसेच बँकेच्या शाखांसाठी एसी खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व मुद्द्यांची चौकशी करून संबंधित कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याच्या निर्देशांमुळे बँकेतील संबंधित आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांची सहकार विभागाकडून छाननी होणार आहे.
तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार बरगे यांनी केली आहे.



