मुंबई

स्मित मच्छार यांच्या प्रकृतीसाठी टिळकनगरमध्ये हनुमान चालीसा पठण

मुंबई : फ्लाय दुबई ह्या हवाई विमान उड्डाणादरम्यान सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले आणि प्रसंगावधान राखत १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी चेंबूरच्या टिळकनगर कॉलनीतील हनुमान मंदिरात आरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले. स्थानिक नगरसेवक सुषम सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

स्मित मच्छार राहत असलेल्या टिळकनगर येथील स्वस्तिक इमारतीतील रहिवाशांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या प्रार्थनेत सहभागी झाले. स्मित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते सुखरूप भारतात परतावेत, यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रार्थना केली.

आरतीनंतर सोसायटीचे सचिव अशोक यांनी स्मित यांचे वडील उपेंद्र मच्छार यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी उपेंद्र मच्छार यांनी सुषम सावंत यांच्याशी संवाद साधत स्मित यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली. स्मित यांनी आज खांद्यावर हात ठेवून सुमारे दहा पावले चालल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या प्रार्थना आणि शुभेच्छा स्मित यांच्या प्रकृतीसाठी सकारात्मक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्मित लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन भारतात परतावेत, यासाठी टिळकनगरवासीयांकडून प्रार्थना करण्यात आली. स्मित भारतात परतल्यानंतर टिळकनगरमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात येईल, असे सुषम सावंत यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button