सायन आणिक आगार मध्ये भीषण आग , उभ्या असलेल्या ८ ते १० बसेस जळून खाक

मुंबई : मुंबईतील बेस्टच्या आणिक आगार डेपोमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला सोमवारी सायंकाळी साडेपाच बाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. पाहता पाहता आगीने शेजारी उभ्या असलेल्या आठ ते दहा इलेक्ट्रिक बसनाही आपल्या कवेत घेतले. या आगीत आठ ते दहा बस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
इलेक्ट्रिक बसला आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे आठ ते दहा अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यापूर्वीही इलेक्ट्रिक बसना आग लागण्याच्या घटना घडल्याने या घटनेमुळे पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या बस बेस्टने वेटलिस्ट कंपनीकडून भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी डीलेल्या असल्याची माहिती आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा तसेच आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.



