मुंबई

भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा,नाहीतर सत्तेवर लाथ मारू!” शिवसेनेचा थेट इशारा

​मुंबई: महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने (शिंदे गट) प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट घरचा आहेर दिला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या ‘अभय योजने’त महापालिका अधिकारी उघडपणे कोट्यवधींचा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग (वॉकआऊट) केला. “भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही स्थायी समितीत पाऊल ठेवणार नाही; गरज पडल्यास सत्तेवरही लाथ मारू,” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

​माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पालिकेत ‘अभय योजना’ आणली होती. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या योजनेचा थेट ‘धंदा’ मांडल्याचा आरोप अमेय घोले यांनी केला.​स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा मांडताना अमेय घोले आक्रमक झाले. ते म्हणाले की,​”सर्वसामान्य गरिबांना न्याय देण्यासाठी ही योजना आणली होती. मात्र, पालिकेचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार करत आहेत. एका-एका फाईलमागे ५ ते १० लाख रुपये उकळले जात आहेत. ‘पिगी बँक’मध्ये पैसे जमा झाल्याशिवाय एकही फाईल पुढे सरकत नाही. कॉलनी ऑफिसर्सकडून प्रत्येकी ५-५ लाखांची लाच मागितली जात आहे. हा अन्याय शिवसैनिक कधीही सहन करणार नाही!”
​
​अभय योजनेतील भ्रष्टाचाराप्रकरणी पालिकेचे तीन जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.​अविनाश पवार,​नितीन सारडा आणि ​आर. सी. राठोड असे ही तीन अधिकारी असून त्यांच्यावर कारवाईची मागणी घोले यांनी केली आहे.

​भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेने थेट सभात्याग करत प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत. “जोपर्यंत या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन गरिबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्थायी समितीच्या कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही. गरिबांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आम्ही सत्तेवर लाथ मारायलाही मागेपुढे पाहणार नाही,” अशा शब्दांत अमेय घोले यांनी पालिका प्रशासनाला ठणकावले.
​या राजकीय वादळामुळे महापालिका वर्तुळात आणि पालिकेतील सत्ताधारी पक्षांमध्येच प्रचंड खळबळ उडाली असून, आता पालिका आयुक्त या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button