सांताक्रुजमध्ये मॅनहोल साफ करताना एकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

मुंबई: मुंबईत मॅनहोलमध्ये उतरून काम करताना आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुज पूर्व येथे घडली. व्ही. एन. देसाई रुग्णालयाजवळील रस्ता क्रमांक आठवरील मॅनहोलमध्ये काम करताना संतोष काष्टे यांचा मृत्यू झाला. याच घटनेत अजय नावाच्या आणखी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संतोष काष्टे हे सांताक्रुज पूर्वेतील नवजीवन चाळीत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मॅनहोल साफ करण्याचे काम विलास जाधव या कंत्राटदारामार्फत करण्यात येत होते. जाधव हे मुंबई महापालिकेचे निवृत्त कर्मचारी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. निवृत्त महापालिका कर्मचारी अशा प्रकारचे कंत्राट कसे घेतात, असा सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
मॅनहोललगत असलेल्या भव्य निकेतन इमारतीतील काही व्यक्तींनी विलास जाधव यांना मॅनहोल स्वच्छ करण्यास सांगितले होते, असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती न देता खासगी कंत्राटदारामार्फत मॅनहोल साफ करण्याचे काम का करण्यात आले, असा प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेनंतर वाकोला पोलिसांनी कंत्राटदार विलास जाधव याला ताब्यात घेतले आहे. घटनेची चौकशी सुरू असून, मॅनहोलमध्ये कामगारांना उतरवताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच हे काम कोणाच्या परवानगीने करण्यात आले, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, संतोष काष्टे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करून न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. या घटनेमुळे मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



